दहिसरमध्ये भिंत कोसळून पिता-पुत्र ठार
By Admin | Updated: March 30, 2015 04:18 IST2015-03-30T04:18:40+5:302015-03-30T04:18:40+5:30
इमारतीजवळ बांधण्यात आलेली संरक्षण भिंत घरावर कोसळून बाप-लेक ठार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी दहिसर येथे घडली.

दहिसरमध्ये भिंत कोसळून पिता-पुत्र ठार
मुंबई : इमारतीजवळ बांधण्यात आलेली संरक्षण भिंत घरावर कोसळून बाप-लेक ठार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी दहिसर येथे घडली. या संदर्भात दहिसर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
दहिसरच्या सरदार वल्लभभाई पटेल नगरात गेल्या काही दिवसांपासून एसआरए प्रकल्पांतर्गत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बाजूलाच विकासकाने दोन महिन्यांपूर्वी एक संरक्षण भिंत उभारली होती. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही भिंत अचानक चंद्रकांत खेडागळे (४५) यांच्या घरावर कोसळली. या वेळी ते आणि त्यांचा १० वर्षीय मुलगा तेजस घरात होते. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. परिसरातील रहिवाशांनी तत्काळ दोघांनाही कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच बाप-लेकाचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)