वसा आरोग्यरक्षणाचा
By Admin | Updated: September 29, 2014 06:46 IST2014-09-29T06:46:54+5:302014-09-29T06:46:54+5:30
भामरागडसारख्या दुर्गम, अतिदुर्गम तालुक्यात हेमलकसा येथे ४० वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली

वसा आरोग्यरक्षणाचा
अभिनय खोपडे, गडचिरोली
भामरागडसारख्या दुर्गम, अतिदुर्गम तालुक्यात हेमलकसा येथे ४० वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. त्यात बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी यांनी गवताने साकारलेल्या बांबूच्या झोपडीत आदिवासींसाठी दवाखाना सुरू केला आणि त्या दिवसापासून सुरू झालेला आरोग्याचा हा महायज्ञ आता एका मोठ्या रुग्णालयात परिवर्तित झालेला आहे.
वंचित आदिवासींसाठी हा दवाखाना म्हणजे एक मायेचे घरच आहे. या दवाखान्यात प्रेमाने रुग्णांची विचारपूस करणारे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी हे खऱ्या अर्थाने सबंध रुग्णांचे दादा व वहिनीच, असे म्हटले तर वावगे होणार नाही. आता आमटे कुटुंंबाच्या तिसऱ्या पिढीच्या प्रतिनिधी डॉ. अनघा आमटे या प्रकल्पातील रुग्णसेवेच्या कामाचे नेतृत्व करीत आहेत. लोकबिरादरी प्रकल्प भामरागड येथे आदिवासींच्या आरोग्यविषयक कामात भरीव योगदान गेल्या ११ वर्षांपासून डॉ. अनघा दिगंत आमटे देत आहेत. आदिवासींमध्ये आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करण्यासोबतच त्यांच्यावर उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचे काम करतानाच त्यांनी या भागात अनेक दुर्धर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्याचे काम केले आहे. याशिवाय महिलांमध्ये आरोग्यविषयक तसेच शिक्षणविषयक जनजागृती करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. २०१२-१३ या वर्षात हेमलकसा रुग्णालयात सुमारे ६ हजार रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. तसेच डॉ. अनघा दिगंत आमटे यांच्या पुढाकाराने गरीब रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. या भागातील शेकडो गावात स्वत: जातीने फिरत त्या रुग्णांना आरोग्यसेवा देत आहेत. तसेच आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये लैंगिक शिक्षणविषयक जनजागृती तसेच शालेय आरोग्यतपासणी आदी कार्यक्रमही अतिशय जोमाने करीत आहेत. अलीकडेच भामरागडसारख्या दुर्गम व अतिदुर्गम असलेल्या तालुक्यात दारूबंदी चळवळ प्रभावीपणे राबविली जावी, यासाठीही त्यांनी महिला बचतगटासोबत काम सुरू केले आहे.
पुण्या-मुंबईसारख्या भागात वास्तव्याला असलेल्या अनघा आमटे मागील एक तपापासून आता गडचिरोली जिल्ह्याच्या मातीशी एकरूप होऊन या भागात आरोग्यसेवेच्या विस्तारासाठी काम करीत आहेत. आपल्या वाट्याला आलेले काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर कायम समाधान असल्याचे दिसून येते. अत्यंत दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना आरोग्यविषयक जाणिवांचीही माहिती नसल्याने त्यांना उपचार व गोळ्या कशा घ्यायच्या यासाठीही प्रबोधन करण्याचे काम डॉ. अनघा आमटे कौशल्याने पार पाडतात. त्यांच्या उपचाराने बऱ्या होऊन जाणाऱ्या अनेक रुग्णांची ही बोलकी प्रतिक्रिया त्यांच्या आरोग्यसेवेची खरी पावती आहे.
लोकबिरादरीत दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारत आहे. ५० रुग्ण राहू शकतील असे सुसज्ज वॉर्ड आहेत. दवाखान्यात सोनोग्राफी, एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, डिलीवरी रूम व आॅपरेशन थिएटर अशा आधुनिक सोयी आदिवासींकरिता विनामूल्य उपलब्ध आहेत. डॉ. प्रकाश व मंदा तसेच त्यांचे थोरले सुपुत्र डॉ. दिगंत व त्यांची पत्नी डॉ. अनघा आदिवासींना लागणाऱ्या आरोग्यसेवेसाठी सदैव तयार असतात. या भागात प्रामुख्याने कुपोषण, जलोदर, हिवताप, क्षय, कावीळ, अॅनिमिया, सिकलसेल अॅनिमिया, कॅन्सर, जंगली श्वापदांच्या हल्ल्याने जखमी झालेले व सर्पदंश झालेले इत्यादी प्रकारचे रुग्ण आढळतात. दरवर्षी जवळपास ४५ हजार रुग्ण लोकबिरादरी दवाखान्याचा विनामूल्य लाभ घेतात.