शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच
By Admin | Updated: March 12, 2016 02:41 IST2016-03-12T02:41:31+5:302016-03-12T02:41:31+5:30
अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात चार शेतकरी आत्महत्या.

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच
अकोला: अर्वषण, नापिकी व कर्जामुळे पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांना पुरते वेठीस धरले असून, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात चार शेतकर्यांनी मृत्यूस कवटाळले. वाशिम जिल्ह्यातील बेलखेड येथील महेंद्र शंकर ठाकरे (२५) या अल्पभूधारक शेतकर्याने गळफास घेऊन १0 मार्च रोजी आत्महत्या के ली. त्याच्याकडे तीन एकर शेती होती. त्यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच काही खासगी कर्ज काढले होते. तथापि, शेतीमधून काहीच उत्पादन होत नसल्याने ते चिंताग्रस्त होते. या परिस्थितीतून मार्ग सापडत नसल्याने त्यांनी स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू तालुक्यातील सुरेश किसन खराटे (४८) यांनी कर्जचा भरणा करून शुक्रवारी गळफास घेतला, तर सावरा येथील अशोक श्रीराम काळे (४७) या अल्पभूधारक शेतकर्याने ९ मार्च रोजी विषारी द्रव्य प्राशून आत्महत्या केली. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी सेवा सहकारी सोसायटीचे ३0 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते तसेच काही जणांकडून उसनवारीनेही पैसे घेतले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील शेतकरी शेषराव हरी इंगळे (५८) यांनीदेखील विषारी औषध प्राशन करून शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर ४0 हजारांचे कर्ज होते.