शेतकरी संघटनेच्या ज्वाळा पुन्हा उफाळतील
By Admin | Updated: November 21, 2014 00:53 IST2014-11-21T00:53:10+5:302014-11-21T00:53:10+5:30
शेतकरी संघटना संपलेली नाही आणि तिचे कामही थांबलेले नाही. विदर्भ - मराठवाड्यात उत्पादन कमी आहे, जे उत्पादन आहे त्याला भाव नाही. महायुद्धानंतर नागरिकांची जशी स्थिती होते

शेतकरी संघटनेच्या ज्वाळा पुन्हा उफाळतील
शरद जोशी : मारवाडी फाऊंडेशनतर्फे प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार प्रदान समारंभ
नागपूर : शेतकरी संघटना संपलेली नाही आणि तिचे कामही थांबलेले नाही. विदर्भ - मराठवाड्यात उत्पादन कमी आहे, जे उत्पादन आहे त्याला भाव नाही. महायुद्धानंतर नागरिकांची जशी स्थिती होते तशीच शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. शेतकरी संघटना संपली, असे समजू नका. काम सुरू आहे आणि संघटनेत राखेतील निखारे आहे. शेतकरी संघटनेच्या ज्वाळा पुन्हा उफाळून येतील आणि हे भाग्य अनुभवण्याची संधी मला मिळावी, अशी भावना शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केली.
मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे पुरस्काराने आज ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम बी. आर. ए. मुंडले सभागृह, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे पार पडला. हा पुरस्कार त्यांना एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून सी. डी. मायी, बुधाजीराव मुळीक, सत्यनारायण नुवाल, डी. आर. मल, विजय मुरारका, श्रीकृष्ण चांडक, शरद पाटील, देशपांडे, अनिल राठी, गोविंद अग्रवाल, महेश पुरोहित उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
शरद जोशी म्हणाले, २००६ साली माझी आणि बाळासाहेबांची भेट झाली. आम्ही दोघेही एकमेकांशी परखडपणे बोललो. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे नेते होते, हे देखील मी त्यांना समजावून सांगितले होते. त्याचा विरोध त्यांनी केला नव्हता. प्रबोधनकार ठाकरे तर फार मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्त्व होते. आजूबाजूला चमत्कार करणारे बाबा, साधू असताना प्रबोधनकारांनी स्वत:चा वेगळा विचार निर्माण केला. ते तंत्रमंत्रात गुंतले नाहीत. त्यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार स्वीकारताना समाधान वाटते. स्वित्झर्लंडवरून परतल्यावर कोरडवाहू शेती घेतली आणि त्यावर पोट सांभाळले. शेतीत प्रयोग केले आणि शेतीतल्या अडचणी लक्षात आल्या. त्यामुळेच शेतकरी संघटना बांधली तेव्हा शेतकऱ्यांचे दु:ख नेमकेपणाने मला कळले होते. अमेरिकेत जसा मार्शल प्लान तयार करण्यात आला होता. तसा मार्शल प्लान शेतकऱ्यांसाठी भारतात तयार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन वाढविण्यासाठी मीडियाने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून मारवाडी फाऊंडेशनची माहिती दिली आणि हा पुरस्कार शरद जोशी यांना देण्यामागची भूमिका विशद केली. शरद जोशी यांचा परिचय शरद पाटील यांनी करून दिला.
राजीव खांडेकर म्हणाले, अतिशय आनंद देणारा हा कार्यक्रम आहे. कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात मोठे काम उभारणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद जोशी यांचा सत्कार करण्याची संधी मला कृतकृत्य करणारी आहे. ज्योतीने तेजाची आरती करावी, असाच हा प्रसंग आहे पण हा सत्कार प्रत्येक मराठी माणसाने कृतज्ञतापूर्वक केला आहे, असे मी मानतो. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात महात्मा गांधी यांच्यानंतर कुणाचे नाव घ्यावे तर ते शरद जोशी यांचे आहे. शेतकऱ्यांना वैचारिक पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिंदू कार्ड चालेल हे बाळासाहेब ठाकरे यांनी ओळखले होते. तसेच हे शरद जोशी यांनीही फार पूर्वीच ओळखले होते. ठोस भूमिका घेत कधीही द्विधा न होता शेतकऱ्यांच्या हिताचे काम सातत्याने केले आणि आजही त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी झटणारा हा एकमेव नेता आहे, असे खांडेकर म्हणाले.
सी. डी. मायी म्हणाले, जोशी यांचे कृषी क्षेत्रातले योगदान विसरता येणे शक्य नाही. यानंतर त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. दत्ता मेघे म्हणाले, शरद जोशींना अनेक राजकीय नेते घाबरतात तसा मी देखील घाबरतो. संसदेत त्यांची शेतीविषयक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकलीत. केंद्र शासनाने शरद जोशी यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका ध्वनिफितीद्वारे जोशी यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्र माचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)
शरद जोशी यांना पद्म पुरस्कार द्यावा
कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात मोठे काम करणारे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांना केंद्र शासनाने पद्म पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी यावेळी बुधाजीराव मुळीक यांनी केली. त्यांच्या या आवाहनाला सर्व अतिथींनी प्रतिसाद दिला. दत्ता मेघे यांनीही भाषणातून शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करावे, असे आवाहन यावेळी केले.