हळद उकळताना कढईत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 16:40 IST2017-04-08T16:40:10+5:302017-04-08T16:40:10+5:30
शेतात काढलेली हळद उकळण्याची प्रक्रिया सुरू असताना उकळत्या कढईत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना

हळद उकळताना कढईत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
फुलसावंगी (यवतमाळ), दि. 8 - शेतात काढलेली हळद उकळण्याची प्रक्रिया सुरू असताना उकळत्या कढईत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील टेंभी (काळी) येथे घडली.
सतीश गणेशराव मस्के (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अल्पभूधारक शेतकरी सतीशने आपल्या शेतात यंदा हळद पिकाची लागवड केली होती. गत पंधरवाड्यात शेतातील हळद काढली. २७ मार्च रोजी हळद उकळण्याची प्रक्रिया सुरू होती. कढईतील पाणी कमी झाल्याने ती भरण्यासाठी पाईप जोडणे सुरू होते. कढईपर्यंत पाईप कमी पडत होता, पाईप ओढत असताना पाईपची कडी निसटली आणि शेतकरी सरळ उकळत्या पाण्यात जाऊन पडला. येथे उपस्थित शेतकऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढले. उकळत्या पाण्याने तो ४५ टक्के भाजला. प्रथम पुसद व नंतर नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सतीशचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे.