शेतकऱ्यांची ओंजळ रिकामीच!
By Admin | Updated: March 29, 2016 01:48 IST2016-03-29T01:48:52+5:302016-03-29T01:48:52+5:30
वरुणराजाच्या अवकृपेमुळे दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नसल्याने शेतीतून हाती काही उत्पन्न मिळणे तर दूरच, शेतीवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. उ

शेतकऱ्यांची ओंजळ रिकामीच!
- दत्ता थोरे, विशास सोनटक्के, प्रताप नलावडे ; लातूर, उस्मानाबाद, बीड
वरुणराजाच्या अवकृपेमुळे दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नसल्याने शेतीतून हाती काही उत्पन्न मिळणे तर दूरच, शेतीवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये कृषीउत्पादनात कमालीची घट झाली आहे. गत पाच वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहे. शेतमालाचे घसरलेले दर, बियाणे, खते, मजुरी तसेच मालवाहतुकीच्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि त्यातच पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. याच कारणामुळे मागील वर्षी दीडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. रबीचा जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे.मात्र रब्बी हंगामातील पीक उत्पादकतेत पाच वर्षांत सुमारे ५५ टक्क्यांहून अधिकची घट झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते.
खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा घेतला जातो. २०१४ मध्ये १ लाख ९२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. हीच परिस्थिती २०१५मध्येही कायम होती. तांदळाच्या उत्पादनात ७०, बाजरी ६१, मका ५९, मुग ५० तर उडीद ४६ तर सोयाबीन व ज्वारीच्या उत्पादनात तब्बल ६६ टक्क्यांनी घट झाली.
लातूर जिल्ह्याला दुष्काळी फटका गेल्या तीन वर्षांचा. ज्या शेतात एकरी १५ ते २० क्विंटल धान्य निघायचे तिथे सध्या एकरात दोन क्विंटलही धान्य शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. दोन वर्षांपूर्वी ३१ लाख ९१ हजार ३२९ क्विंटल धान्याची जिथे आवक झाली होती; त्या लातूर कृषीउत्पन्न बाजार समितीत यंदा १९ लाख ५५ हजार ८१० क्ंिटलचीच आवक झाली. या काळात जवळपास ४० टक्क्यांनी घट नोंदवली गेल्याचे बाजार समितीचे अध्यक्ष रतीलाल शहा यांनी सांगितले.
लातूरमध्ये खरिपाचे एकूण क्षेत्र ५ लाख ५६ हजार हेक्टर. त्यात यंदा घट होऊन पेराच चार लाख ९० हजार हेक्टरवर झाला. दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली; पण तीही वाया गेली. लातूरची बाजारपेठ ही सोयाबीन आणि हरभरा केंद्री असते. २०१३-१४ साली १६ लाख लाख ८६ हजार ९९९ क्विंटल सोयाबीन आले होते. तर २०१५-१६ साली बाजार समितीत फक्त नऊ लाख ५० हजार ६३८ क्विंटल सोयाबीन आले. यातील अर्धे सोयाबीन कर्नाटक तर अर्धे जिल्ह्यातून उत्पादित झालेले आहे. यंदा जिल्ह्यातील ९४७ म्हणजे सर्वच्या सर्व गावांची आणेवारी ही ५० टक्क्यांच्या आत आहे.
बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरी निम्माही पाऊस झाला नाही. परिणामी कृषीउत्पादनात सरासरी तिपटीने घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर यंदा आणखी वाढला आहे.
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि बाजरीचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यावर्षी चार लाख २० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. मागील तुलनेत कापसाची लागवड वाढली असली तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलेले नाही.
जानेवारीत बाजारामध्ये ज्वारीची आवक १२०० क्विंटल, गावरान बाजरी १९३ क्विंटल, हायब्रीड ज्वारी १२११, गहू ५१ क्विंटल तर तूरीची तीन हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. गत तीन वर्षांच्या तुलनेत ही सर्व आवक तिपटीने घटली आहे. बालाघाटच्या डोंगररांगात सीताफळाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते. या फळालाही दुष्काळाचा फटका बसला आहे.
च्जिल्ह्यातून डेअरीसाठी अडीच लाख लिटर दूध दररोज जात होते. आता यात एक लाख लिटर दूधाची घट झाली असून दररोजचे दूध संकलन दीड लाखावर आले आहे.