शेतकरी पाण्याअभावी अडचणीत
By Admin | Updated: November 11, 2015 02:51 IST2015-11-11T02:51:26+5:302015-11-11T02:51:26+5:30
खरिपाच्या आवर्तनापेक्षा जास्त पाणी सिंहस्थत गंगापूर धरणातून वापरण्यात आले. त्यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने आगामी काळात गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणीच मिळणार नसल्याने शेकडो एकर शेती

शेतकरी पाण्याअभावी अडचणीत
नाशिक : खरिपाच्या आवर्तनापेक्षा जास्त पाणी सिंहस्थत गंगापूर धरणातून वापरण्यात आले. त्यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने आगामी काळात गंगापूर धरणातून शेतीसाठी पाणीच मिळणार नसल्याने शेकडो एकर शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे.
जलचिंतन संस्थेमार्फतच जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका फेटाळल्यानंतर नुकतेच गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी व दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांविरोधात नुकतेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आरोप केले होते.
जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, दारणा धरणातून तरी यापुढे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. मात्र गंगापूर धरणातून शेतीसाठी एक थेंबही आता आवर्तन सुटणार नसल्याने या परिसरातील शेती उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गंगापूर धरण समूहात १७०.८० दलघमी पाण्याचा साठा असून, खरिपात ५४.५८ दलघमी पाणी वापरण्यात आले. २२५.३८ पाणीसाठा १५ आॅक्टोबर २०१५ पर्यंत उपलब्ध होता. त्यापैकी ३८.३८ दलघमी म्हणजेच १.३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले, तर दारणात ३८६.८८ दलघमी पाणीसाठा उपयुक्त होता. महापालिकेच्या पाण्यात कपात करून शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. नाही तर शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे राजेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)