शेतक-यांना आता केवळ पीक विम्याचा आधार
By Admin | Updated: October 7, 2014 23:26 IST2014-10-07T23:22:46+5:302014-10-07T23:26:49+5:30
पश्चिम व-हाडात पीक विम्यापोटी १0 कोटी २६ लाखांची गुंतवणूक.

शेतक-यांना आता केवळ पीक विम्याचा आधार
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)
अनियमित पावसामुळे होणार्या पीक नुकसानाची भरपाई मिळावी, याकरीता पश्चिम वर्हाडातील ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांची पीक विमा गुंतवणूक केली आहे. गत सप्टेंबर महिन्यात पश्चिम वर्हाडात पावसाचा एक थेंबही न आल्यामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्यांना आता पीक विम्याचाच आधार उरला आहे.
पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तीन जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासून पावसाची अनिश्चितता होती. पावसाच्या हुलकावणीमुळे तब्बल एक महिना उशिरा खरीप हंगामाची पेरणी झाली. अनियमित पावसामुळे व उशीरा झालेल्या पेरणीमुळे होणार्या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, याकरीता पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत सुरूवातीला ३१ जुलैपर्यत होती. ती वाढवून १६ ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकर्यांनी यावर्षी पीक विमा काढण्याला प्राधान्य दिले.
पश्चिम वर्हाडातील ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्यांनी २ लाख ८0 हजार ३२४ हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला आहे. त्यासाठी सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता शेतकर्यांनी भरला आहे. यात अकोला जिल्ह्यातील ६७ हजार १४ शेतकर्यांनी ७६ हजार ८0२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी २ कोटी ८७ लाख ३४ हजार रुपये हप्ता शेतकर्यांनी भरला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता शेतकर्यांनी भरला आहे. वाशिम जिल्ह्यातील ६४ हजार २५१ शेतकर्यांनी ७४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपये हप्ता शेतकर्यांनी भरला आहे.
पश्चिम वर्हाडात गत सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाची पीके सुकून गेली; तर अत्यल्प पावसाने अनेक शेतातील पिके वाळली आहेत. अनियमित पावसामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमा काढलेले ३ लाख ६ हजार ६८१ शेतकरी आता पीक विम्याचा लाभ मिळेल, या एकमेव आशेवर आहेत.