अडत न लागल्याने शेतकरी आनंदीत
By Admin | Updated: July 21, 2016 19:37 IST2016-07-21T19:37:30+5:302016-07-21T19:37:30+5:30
तब्बल १३ दिवसांच्या बेमुदत बंद नंतर गुरुवारी जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार सुरु झाला. दुपारपर्यंत शेतकऱ्यांनी ४०५ क्विंटल धान्य विक्रीला आणले

अडत न लागल्याने शेतकरी आनंदीत
धान्याला चांगला भाव : अडत बाजारात ४०५ क्विंटल धान्याची आवक
औरंगाबाद- तब्बल १३ दिवसांच्या बेमुदत बंद नंतर गुरुवारी जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार सुरु झाला. दुपारपर्यंत शेतकऱ्यांनी ४०५ क्विंटल धान्य विक्रीला आणले. हर्राशीत गहू,शाळू ज्वारी, बाजरी व तूरीला क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये जास्तीचा भाव मिळाला.
शेतकऱ्यांकडून अडत वसूल करण्यात येवू नये, या राज्याशासनाच्या अध्यादेशाचे पालन करण्यास बुधवारी अडत व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवित आपला बेमुदत बंद मागे घेतला. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील धान्याच्या अडत बाजाराला १३ दिवसानंतरआज सकाळी सुरूवात झाली. बाजार सुरु होणार यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्याकडील शिल्लक गहू,ज्वारी, बाजरी विक्रीला आणली होती. बाजार समितीच्या अहवालानुसार आज १३१ क्विंटल गहू, ४३ क्विंटल शाळू ज्वारी, २२३ क्विंटल बाजरी तर ८ क्विंटल तूर विक्रीला आली होती. दुपारी हर्राशीला सुरुवात झाली यावेळीस अडते व खरेदीदार मिळून ४० जण हजर होते. औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सर्वांना बुधवारी झालेल्या अडत व खरेदीदारांच्या बैठकीत एकमताने झालेल्या नियमाची पुन्हा माहिती दिली.
शेतकऱ्यांकडून अडत घेणार नाही त्या ऐवजी खरेदीदारांनी दिड टक्का अडत द्यावी व हर्राशी झाल्यानंतर खरेदी केलेल्या धान्याची रक्कम नऊ दिवसाच्या आत अडत्याला द्यावी, असे सांगण्यात आले. यानंतर हर्राशीला सुरुवात झाली. बाजरी १६०० ते १९०० रुपये, शाळू ज्वारी १७२० ते २२०० रुपये, गहू १७०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. तूरीला ७५०० ते ८१९० रुपये प्रतिक्विंटलभाव शेतकऱ्यांना मिळाला. ५ जुलैच्या तुलनेत आज धान्याला क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये भाव जास्त मिळाला. अध्यक्ष जैस्वाल यांनी सांगितले की, हर्राशी सुरु होण्यापूर्वी काही खरेदीदारांनी आक्षेप घेतला होता मात्र, नंतर हर्राशी सुरळीत पार पडली.