सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: July 21, 2016 22:31 IST2016-07-21T22:31:02+5:302016-07-21T22:31:02+5:30
जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील कान्हा येथील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या तगाद्याला व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला

सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 21 - जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील कान्हा येथील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या तगाद्याला व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जुलैच्या पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
कान्हा येथील पांडुरंग चिभडे या शेतकऱ्याचे मराठवाडा ग्रामीण बँकेचे कर्ज पुनर्गठन, हैदराबाद बँकेचे कर्ज पुनर्गठन झाले नव्हते. यामुळे पांडुरंग चिभडे हे अस्वस्थ होते. चिभडे यांनी खाजगी सावकार तात्याराव चव्हाण याच्याकडून २५ हजार रुपये घेतले होते. २० जुलै रोजी तात्याराव चव्हाण व अन्य दोन जणांनी चिभडे यांच्याकडे शेतात येऊन पैशांची मागणी केली होती. बुधवारी रात्री पुन्हा चव्हाण पैशांची मागणी करीत होते. पैसे नसल्याचे सांगताच चव्हाण यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली. यावेळी रामकिशन चिभडे, शिवाजी चिभडे यांनी झालेले भांडण सोडविले. त्यावेळी चव्हाण यांच्याकडून चिभडे यांना धमक्या देण्यात आल्या. २० जुलैच्या रात्री पांडुरंग चिभडे यांनी शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला फाशी घेतली. ही बाब २१ जुलै रोजी सकाळी रामकिशन चिभडे यांच्या निदर्शनास आली. यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़एस़ खान, पोलिस जमादार हेमराज नैतम, जगताप यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला़ या प्रकरणी रुख्मिणबाई चिभडे यांच्या फिर्यादीवरुन बामणी पोलिस ठाण्यात खाजगी सावकार तातेराव चव्हाण, गजानन करसकर, बाबासाहेब ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ तपास सपोनि एस़एस़ खान करीत आहेत़