मोदी सरकारच्या काळात शेतकरी रडकुंडीला

By Admin | Updated: October 10, 2014 22:58 IST2014-10-10T22:46:28+5:302014-10-10T22:58:30+5:30

अजित पवार : इचलकरंजीत सभा

Farmer Radkundela during the Modi government | मोदी सरकारच्या काळात शेतकरी रडकुंडीला

मोदी सरकारच्या काळात शेतकरी रडकुंडीला

इचलकरंजी : ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या कालावधीत साखरेचे दर उतरले. आता उसाला चांगला दर कसा मिळणार, तर कांद्याचे भावही उतरल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच वेगवेगळ्या जातीधर्मातील नेतृत्वाला प्रलोभने दाखवित सत्तेवर आल्यावर मोदींनी रामदास आठवले, यशवंत जानकर आणि राजू शेट्टी यांना दिलेला मंत्रिपदाचा शब्द फिरविला, अशी टीका केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, मागील वर्षी याचवेळी तीन हजार रुपये क्विंटल असणारी साखर आता २७०० रुपये झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळणार, याची चिंता असतानाच कांद्याचेही भाव उतरल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. याउलट शरद पवार कृषिमंत्री असताना ते नेहमी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, यासाठी नियोजनबद्ध धोरण आखत; पण मोदी सरकार व्यापारधार्जिणे आहे.
वीज चोरी करणारा आमदार निवडून आणल्यामुळे इचलकरंजीची मान शरमेने खाली गेल्याची खंत व्यक्त करीत पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्वच्छ प्रतिमेच्या मदन कारंडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. पक्षाशी गद्दारी करून भाजपला पाठिंबा देणाऱ्या अशोक स्वामी यांची हकालपट्टी करीत असल्याची घोषणा केली. तर पक्षातील अन्य स्थानिक नेत्यांनी यापासून धडा शिकून उद्यापासून कारंडे यांच्या प्रचाराच्या कार्यात झोकून द्यावे, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer Radkundela during the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.