ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील शेतमजुराच्या मुलीने देशपातळीवरील ‘इन्स्पायर अॅवॉर्ड’ मधील प्रदर्शनात बहुउद्देशीय कृषी यंत्र बनवत पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. तिची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे ‘सकुरा एक्स्चेंज प्रोगॅ्रम आॅफ जपान’च्या वैज्ञानिक दौऱ्यासाठी सांगली जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. अंजली आनंदा कोकरे असे तिचे नाव. याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.अंजलीने तयार केलेल्या या यंत्रामुळे ठिबक सिंचन पाईप गोळा करणे, केबल वायर गोळा करणे, मका, सूर्यफूल सोलणे, खोबरे खिसणे, नारळ सोलणे, फळे कटिंग करणे, उसाचे डोळे काढणे, कडबा कुट्टी करणे आदी वेगवेगळ्या कामासाठी उपयोग होणार आहे. लोकांची मजुरी, वीज व वेळेची बचत होणार आहे.सध्या ती येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ जपान या दौऱ्यात ती आठवडाभर जपानमधील प्रगत सायन्स व तंत्रज्ञान विद्यापीठे, इन्स्टिट्यूट यांना भेट देणार आहे. येथील विज्ञान व तंत्रज्ञान मार्गदर्शन वर्गात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राज्यातून आणखी २० विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.तिला तत्कालीन जिल्हा परिषद शिक्षिका सुस्मिता पाटील, मुख्याध्यापक सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या निवडीबद्दल कर्मवीर विद्यालय व ऐतवडे बुद्रुक नं. १ सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)अंजलीला हवाय दानशूरांच्या मदतीचा हातअंजली कोकरे हिचे वडील आनंदा कोकरे हे शेतमजूर आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दिल्लीला इन्स्पायर अॅवॉर्डसाठी येणाऱ्या खर्चासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावे लागले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने जिद्दीने व कष्टाने शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे हे बहुउद्देशीय बनवून प्रथम क्रमांक पटकाविला. हे यंत्रासाठी जरी जपानसाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा सरकारने उचलला असला तरी, तेथील खर्चासाठी व भविष्यातील शैक्षणिक खर्चासाठी समाजाने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतमजुराची मुलगी चालली जपानला
By admin | Updated: February 11, 2015 00:01 IST