भरधाव इनोव्हाने घेतले तीन बळी
By Admin | Updated: July 20, 2016 06:10 IST2016-07-20T06:10:48+5:302016-07-20T06:10:48+5:30
दोन गाड्यांना समोरसमोर जोरदार धडक दिल्याने इनोव्हा कारचा चालक, टॅक्सी ड्रायव्हर, एका प्रवासी असे तिघे ठार झाले

भरधाव इनोव्हाने घेतले तीन बळी
मुंबई: ‘ईस्टर्न फ्री-वे’वर मंगळवारी सकाळी भरधाव इनोव्हा कारने दुभाजकाला धडक देत अन्य दोन गाड्यांना समोरसमोर जोरदार धडक दिल्याने इनोव्हा कारचा चालक, टॅक्सी ड्रायव्हर, एका प्रवासी असे तिघे ठार झाले. आरसीएफ पोलिसांनी याबाबत मयत इनोव्हा कारचालकावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मंगळवारी सकाळी माझगाव येथे राहणारे अब्दुल हमीद सिरवा(४८) हे त्यांच्या इनोव्हा कारने (एमएच ०४-डी.एस. २६०४) ठाण्याच्या दिशेने जात होते. त्यांची गाडी सकाळी सव्वानऊच्या सुमारास चेंबूर जिजामाता नगर येथे येताच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार दुभाजकावर चढून ती मुंबईकडे जाणाऱ्या विरुद्ध दिशेला घुसली. याच दरम्यान ठाण्याहून मुंबईच्या दिशेने नंदलाल जैस्वाल (४६) हे त्यांच्या टॅक्सीने (एमएच १-बी.एम.५१७१) विजयकुमार केळकर (४०) या प्रवाशाला घेऊन जात होते. इनोव्हा कारने समोरसमोर या टॅक्सीला धडक दिली. त्यामुळे या अपघातात टॅक्सीचा पूर्णपणे चुराडा
झाला.
तर याच दरम्यान एक स्विफ्ट डिझायर कारदेखील टॅक्सीच्या मागून येत होती. या कारलाही इनोव्हाने जोरदार धडक दिली. मात्र या गाडीतील महेश कुकळेकर (३८) व त्यांचा सहकारी अजय जाधव (३३) हे दोघेही बचावले. अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
अपघात इतका भयंकर होता, की टॅक्सी आणि इनोव्हामधील जखमींना बाहेर काढणे पोलिसांना शक्यच झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले. अग्निशामक जवानांनी गॅस कटरच्या साह्याने टॅक्सी आणि इनोव्हा कारचा पत्रा कापून या जखमींना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.