ठोक पगारी चालक-वाहक भरतीस नकार

By Admin | Updated: June 30, 2016 03:19 IST2016-06-30T03:19:42+5:302016-06-30T03:19:42+5:30

६० बस चालक-वाहकांअभावी धूळखात पडल्याने प्रशासनातर्फे त्यांची ठोक पगारी तत्त्वावर भरती केली जाणार होती.

False payroll driver-carrier recruitment refuses | ठोक पगारी चालक-वाहक भरतीस नकार

ठोक पगारी चालक-वाहक भरतीस नकार


कल्याण : केडीएमटीत दाखल झालेल्या ६० बस चालक-वाहकांअभावी धूळखात पडल्याने प्रशासनातर्फे त्यांची ठोक पगारी तत्त्वावर भरती केली जाणार होती. परंतु, यासंदर्भात केलेला ठराव राज्य सरकारने फेटाळल्याने कंत्राटी प्रक्रिया पद्धतीने चालक-वाहक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटीत १८५ बस येणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालकांअभावी नागरिकांना चांगली सेवा देता येत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बस निधीअभावी अजूनही केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष वेधताना परिवहन सदस्यांनीही कर्मचारी भरतीचा विषय सातत्याने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापती, सदस्य आणि अधिकारी यांची बैठक झाली होती. त्यात तातडीने ठोक पगारी तत्त्वावर वाहक व चालकभरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रस्ताव मंजूर केला.
नवीन पदनिर्मितीस बंदी
सरकार निर्णयानुसार वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन पदनिर्मितीस बंदी आहे. हा निर्णय राज्यातील सर्व महापालिकांना लागू आहे. त्यानुसार, केडीएमटीतील पदे बाह्य यंत्रणांकडून (आउट सोर्सिंग) भरावीत. त्यासाठी कोणतीही पदनिर्मिती न करता त्यावरील खर्च ‘कार्यालयीन खर्च’ या उद्दिष्टाखाली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नातून भागवावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
आजच्या बैठकीकडे लक्ष : मात्र, याबाबत भविष्यात अडचण उद्भवल्यास वाहक आणि चालकांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय सरकारने दिला आहे. त्याआधारे आता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा निर्णय केडीएमटी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारी होणाऱ्या केडीएमटीच्या बैठकीत बाह्य यंत्रणेकडून प्रस्ताव मागवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सादर
केला आहे.
चालकांअभावी सेवा नाही : पुरेशा बस असूनही चालकांअभावी नागरिकांना चांगली सेवा देता येत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बस निधीअभावी अजूनही केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत.

Web Title: False payroll driver-carrier recruitment refuses