धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्टला जेल भरो
By Admin | Updated: July 27, 2016 23:36 IST2016-07-27T23:36:08+5:302016-07-27T23:36:08+5:30
राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली

धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्टला जेल भरो
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समिती आणि भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनगर आरक्षणासाठी विधानसभेत शिरकाव करण्याचा इशारा दिला आहे. पाटील म्हणाले की, धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यास सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. समाजाच्या नेत्यांना मंत्रिपद देऊन सरकार धनगर आरक्षणाच्या चळवळ संपवू पाहत आहे. त्यासाठीच समाजाच्या सर्व्हेक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेचे निवड सरकारने केलेली आहे. मुळात टीसची निवड संविधानाला धरून नाही. त्यामुळे सरकारने ही निवड रद्द करून तत्काळ आरक्षण देण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
१ आॅगस्टला सरकारने धनगर समाजातील लोकांना एसटी प्रवर्गाचे दाखले दिले नाही, तर विधानसभेत घुसून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनास माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.