रेल्वेच्या दोन मार्गांवर ‘बिघाड’वार
By Admin | Updated: December 25, 2014 02:17 IST2014-12-25T02:17:49+5:302014-12-25T02:17:49+5:30
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बुधवारचा दिवस हा प्रवाशांसाठी ‘बिघाड’वारच ठरला. सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी स्थानकाजवळ

रेल्वेच्या दोन मार्गांवर ‘बिघाड’वार
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बुधवारचा दिवस हा प्रवाशांसाठी ‘बिघाड’वारच ठरला. सकाळी पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी स्थानकाजवळ विद्युतपुरवठा बंद झाल्याने आणि त्यानंतर दुपारी मध्य रेल्वेमार्गावरील सायनजवळ रेल्वेरुळाला तडा गेल्याने दोन्ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या.
सकाळी साडेनऊच्या सुमारास अंधेरी स्थानकाजवळ रेल्वेला होणारा विद्युतपुरवठा बंद झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद झाली आणि पश्चिम रेल्वेला ‘ए’ मार्करवर सिग्नल यंत्रणा सुरू ठेवणे भाग पडले. त्यामुळे अंधेरी स्थानक आणि तेथून अप आणि डाऊनला जाणाऱ्या धिम्या आणि जलद लोकल सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वे मार्गावरील सायन ते माटुंगा दरम्यान अप (सीएसटी दिशेने) धिम्या मार्गावर दुपारी बाराच्या सुमारास रुळाला तडा गेल्यामुळे या मार्गावरील लोकल विद्याविहार ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आणि लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. (प्रतिनिधी)