फडकू दे तिरंगा ललिताच्या हातून!
By Admin | Updated: August 15, 2016 00:51 IST2016-08-15T00:51:51+5:302016-08-15T00:51:51+5:30
आज रात्री पावणे आठ वाजता घमासान : आॅलिम्पिक स्पर्धेतील अंतिम फेरीकडे नजरा

फडकू दे तिरंगा ललिताच्या हातून!
सातारा : स्वातंत्र्यदिनी सोमवारी देशभर तिरंगा डौलाने फडकविला जाणार आहे. सर्वत्र देशभक्तीपर गीते ऐकायला मिळणार आहेत; पण यंदाचा स्वातंत्र्यदिन सातारकर अन् देशवासीयांसाठी नवचेतना घडवणारा असणार आहे. ‘रिओ’ येथे सुरू असलेल्या तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सोमवार, दि. १५ रोजी घमासन होणार आहे. ललिताच्या यशाने चक्क रिओत तिरंगा फडकणार आहे.
रिओ आॅलिम्पिकमध्ये महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसची पात्रता फेरी शनिवारी सायंकाळी झाली. या स्पर्धेत राउंडमध्ये चौथी आली असली तरी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पंधरा जणींमध्ये सातवा क्रमांक मिळविला आहे. ललिताने अंतिम फेरीत धडक मारल्याचे समजल्यावर सातारकरांचाच नाही तर देशवासीयांचा उर अभिमानाचे भरून आला. क्रीडाप्रेमींच्या नजरा सोमवारी होणाऱ्या स्पर्धेकडे लागल्या आहेत. तिला यामध्ये यश मिळावे, यासाठी ग्रामदैवतांकडे प्रार्थना करत आहेत. (प्रतिनिधी)
शंभू महादेव पावणार
अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवावर राज्यासह परराज्यातील शेकडो लोकांची श्रद्धा आहे. शिखर शिंगणापूरपासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या मोही येथील ललिता बाबर रिओमध्ये देशाचे नेतृत्त्व करत आहे. तिला यश मिळावे म्हणून तिच्या आई-वडिलांनी शंभू महादेवाला शनिवारी अभिषेक घातला होता. अंतिम सामना सोमवारी होत आहे. श्रावणी सोमवार असल्याने या दिवशी शंभू महादेव ललिताला नक्की आशीर्वाद देईल, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.