फडणवीस सक्षम मुख्यमंत्री नाहीत - नारायण राणे
By Admin | Updated: November 4, 2014 20:14 IST2014-11-04T16:50:25+5:302014-11-04T20:14:56+5:30
मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी लागणारे चातुर्य, अनुभव देवेंद्र फडणवीसांकडे नाही असे सांगत ते सक्षम मुख्यमंत्री नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली.

फडणवीस सक्षम मुख्यमंत्री नाहीत - नारायण राणे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनतेला दिलेली आश्वासने, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची क्षमता नसून ते सक्षम मुख्यमंत्री नाहीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. फडणवीस प्रामाणिक आहेत, त्यांची प्रतिमा चांगली आहे, मात्र मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी जो अनुभव, प्रशासकीय चातुर्य लागते ते त्यांच्याकडे नाही. ते स्वत:च्या मनाने काम करू शकतील असं वाटत नाही, त्यांना दिल्लीच्या आदेशाचीच वाट पहावी लागेल असे राणे म्हणाले. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणा-या फडणवीसांनी स्वतंत्र विदर्भाची भाषा करू नये असा इशाराही त्यांनी दिला. भाजपामध्ये एकनाथ खडसेंशिवाय प्रभावी मंत्री नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादीने स्थिरतेसाठी पाठिंबा दिला की स्वसंरक्षणासाठी ते अजून स्पष्ट झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिवसेनेवरही कडाडून हल्ला चढवला. सत्तेसाठी आसुसलेल्या शिवसेनेने भाजपासमोर गुडघे टेकत लाचारी पत्करल्याचा घणाघाती आरोप राणेंनी केला. निवडणुकीदरम्यान ज्यांना अफझलखानाची फौज संबोधले, त्याच फौजेत सामील होण्यास शिवसेना कशी तयार होते असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर सत्तेवर लाथ मारून ते विरोधात बसले असते असेही ते म्हणाले.