फडणवीस काकूंचा टोलविरोधी लढा!
By Admin | Updated: January 17, 2015 06:52 IST2015-01-17T06:00:20+5:302015-01-17T06:52:43+5:30
राज्यातून टोल हद्दपार करणार, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला

फडणवीस काकूंचा टोलविरोधी लढा!
नागपूर : राज्यातून टोल हद्दपार करणार, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला की काय, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनीच आता टोलविरोधी लढा देण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्राने आजवर ‘काका-पुतण्यांचे राजकारण अनुभवले आहे. आता ‘काकू-पुतण्या’चे राजकारण किती रंगते, याचे औत्सुक्य सर्वांना लागून आहे.
नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी व मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असून, येथे अवैधरीत्या वसुली करण्यात येत आहे, असा थेट आरोप आ. शोभा फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्या म्हणाल्या, टोलनाके असलेला हा मार्ग ९५ कि.मी. लांब अंतराचा असला, तरी प्रत्यक्षात याचे बांधकाम ५८ कि.मी. झालेले आहे. प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली करता येते. मात्र ६० टक्के काम पूर्ण झाल्यावर कंपनीने टोल वसुली सुरू केली आहे. टोल वसुलीचे कंत्राट २०३७पर्यंत असताना कंपनीने दोन वर्षांत संपूर्ण खर्च वसूल केलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे, या टोलनाक्याविरोधात केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी जनतेच्या खिशातून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करीत असल्यामुळे या टोलविरोधात २१ जानेवारीपासून आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. फडणवीस यांनी दिला. या इशाऱ्यामुळे भाजपाच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.