फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं जिंकला
By Admin | Updated: November 12, 2014 12:55 IST2014-11-12T12:55:08+5:302014-11-12T12:55:08+5:30
भारतीय जनता पक्षाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. फडणवीस सरकारने यासह पहिल्या भाजपा सरकारची पहिली बाजी मारली असून

फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं जिंकला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - भारतीय जनता पक्षाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. फडणवीस सरकारने यासह पहिल्या भाजपा सरकारची पहिली बाजी मारली असून, शिवसेनेचा विरोध डावलत भाजपाने आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आधी विरोधी पक्षनेतेपद जाहीर व्हावे असे सांगत शिवसेनेनं विश्वासदर्शक ठरावाला विरोध केला होता. परंतु, आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आवाजी मतदानानं भाजपाला तारून नेलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानानं भाजपाला बहुमत मिळाल्याचं जाहीर करत सभागृहाचं शिक्कामोर्तब केलं.
हा ठराव मंजूर झाल्यानंतर काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. काल रात्रीपर्यंत खल झाल्यानंतर शिवसेनेनं विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपानं बाजी मारल्याचं दिसत आहे. भाजपानं सध्यातरी विश्वासदर्शक ठराव रेटून नेला असला तरी यानंतर ज्यावेळी महत्त्वाचे प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीसाठी येतील त्यावेळी फडणवीसांना अनुकूल पाठिंबा मिळेल का आणि त्यावेळी राष्ट्रवादी काय भूमिका घेईल यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
दुपारी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी आधी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा आधी होईल असे ठरले होते. परंतु, विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नक्की कोण आहे याबाबत संभ्रम असल्याचं सांगत, विश्वासदर्शक ठराव आशिष शेलार मांडतिल असं सांगितलं. शेलार यांनी लगेच ठराव वाचला आणि आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केला.
यामागोमाग शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केलं. या ठारावमुळे आता फडणवीस सरकार किमान सहा महिने सत्तेवर राही हे निश्चित झालं आहे. ठरावासाठी आवाजी मतदानाचा मार्ग का स्वीकारण्यात आलं, मतदान का घेण्यात आलं नाही, नक्की ठरावाच्या बाजुने किती आमदार होते विरोधात किती होते या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या आहेत.