कारखाने चालती ‘खासगी’ची वाट!

By admin | Published: May 11, 2015 05:09 AM2015-05-11T05:09:14+5:302015-05-11T05:09:14+5:30

सहकार चळवळीचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत सहकाराला घरघर लागलेली आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची पावले ‘खासगी’कडे वळली.

Factory running 'Private' walk! | कारखाने चालती ‘खासगी’ची वाट!

कारखाने चालती ‘खासगी’ची वाट!

Next

अमोल मचाले, पुणे
सहकार चळवळीचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत सहकाराला घरघर लागलेली आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची पावले ‘खासगी’कडे वळली (की वळवण्यात आली?) आहेत.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सहकार क्षेत्र समर्थपणे वाटचाल करीत असतानाच २१ व्या शतकाच्या प्रारंभापासून सहकाराच्या या पंढरीला स्वाहाकाराचा विळखा बसू लागला अन् खासगी कारखान्यांची संख्या वाढू लागली. प्रारंभी याची पकड फारशी जाणवली नसली तरी आता स्वाहाकाराच्या या विळख्याने सहकारी कारखान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल २८ सहकारी साखर कारखाने खासगीमध्ये परावर्तित झाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, साखर कारखान्यांच्या सहकारातून खासगीकरणाचा आकडा येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
१९५०-५१ मध्ये सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. खासगी कारखान्यांच्या पिळवणुकीमुळे त्रस्त असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांच्या रुपात जीवनदान मिळाले. ही सहकार चळवळ पुढे देशभरात फोफावली. या चळवळीतून अनेक नेते उदयास आले. काहींनी तर राष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केला. मात्र, सन २००० नंतर सहकारातील काही ‘वजनदार’ नेत्यांना स्वाहाकाराची लागण प्रमाणापेक्षा जास्त झाली आणि त्यातूनच सहकाराची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली.
२००२ मध्ये सहकारी कारखान्यांची तारण मालमत्ता विकण्यासंदर्भातील सेक्रुटायझेशन अ‍ॅक्ट अस्तित्वात आल्यापासून या व्यवहारांना प्रारंभ झाला.
‘‘सहकारी कारखाने व्यवसायाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वदेखील पार पाडतात. बहुतांश खासगी कारखान्यांना सामाजिक उत्तरदायित्वासोबत काहीही देणेघेणे नसते. हे देखील खासगी कारखाने आर्थिकदृष्ट्या परवडण्यामागे एक कारण आहे,’’ असे पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखानदाराने सांगितले.

वर्षागणिक वाढताहेत खासगी कारखानदार
१९५०-५१मध्ये पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला तेव्हा राज्यात १२ खासगी कारखाने होते.
१९९०-९१मध्ये राज्यातील खासगी कारखान्यांची संख्या केवळ ८ होती. २०००-२००१ मध्ये ती १३ वर गेली. यानंतर खासगी कारखान्यांची संख्या सातत्याने वाढत गेली.
२००७-०८मध्ये राज्यात सर्वाधिक १४५ सहकारी कारखाने होते. त्यानंतर ही संख्या कमी होत गेली.
२०१३-१४ ते २०१४-१५ या काळात राज्यामध्ये एकूण २० कारखाने वाढले. यापैकी १७ कारखाने खासगी होते.

Web Title: Factory running 'Private' walk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.