धरणग्रस्त वसाहतीत सुविधांची वानवा
By Admin | Updated: July 4, 2016 01:36 IST2016-07-04T01:36:34+5:302016-07-04T01:36:34+5:30
धरणासाठी आपल्या मूळ जागा देऊन दुसरीकडे स्थलांतरित झालेले गुंजवणी धरणग्रस्त वसाहतीतील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत.

धरणग्रस्त वसाहतीत सुविधांची वानवा
मार्गासनी : धरणासाठी आपल्या मूळ जागा देऊन दुसरीकडे स्थलांतरित झालेले गुंजवणी धरणग्रस्त वसाहतीतील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत.
गुंजवणी धरणाच्या उजव्या तीरावर घरे बांधताना नवीन संसार उभा करताना येणाऱ्या अडचणीमुळे अश्रूंचा बांध फुटत काही आपल्या व्यथा ‘लोकमत’कडे मांडल्या. पूर्णत: बुडीत कोदापूर गावातील धरणग्रस्तांच्या गुंजवणी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षी पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याने कोदापूर गाव हे पाण्याखाली जाणार असल्याने धरणग्रस्तांना गाव सोडावे लागले. या गावातील धरणग्रस्तांना गुंजवणी धरणाच्या तीरावर गावठाण क्रमांक १ व २ बसविले आहेत. परंतु गावठाण क्रमांक १ मध्ये काहीच घरे पूर्ण होत असली तरी काहींनी निवारा शेडमध्येच राहणे पसंत केले आहे.
या गावठाणासाठी जरी शासनाकडून काही सुविधा पुरविल्या गेल्या असल्या, तरी अनेक सुविधांपासून हे गावठाण वंचित राहिल्याची बाब पुढे येत आहे.
या गावठाणातील अंतर्गत रस्ता मातीचा असल्याने पावसाने या ठिकाणी दळणवळण करणे अवघड झाले असून, बांधकामासाठी उपयुक्त असलेले साहित्य हे वसाहतीपासून दूर अंतरावर उतरवले जात असल्याने बांधकामास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पक्का रस्ता होण्याची मागणी होत आहे.
या गावठाणात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे
लागत आहे. येथील महिलांना
दीड किलोमीटरवरून वेल्हे किंवा
भट्टी वाघदरा या गावातून भर
पावसात कसरत करून पाणी
आणावे लागत आहे.
मुलांना शाळा सोडून दोन किलोमीटर चालत वेल्हे या
ठिकाणी शाळेत जावे लागते.
शेतीही धरणात गेल्याने उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन त्यांच्याकडे नसल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणताही रोजगार व उदरनिर्वाहासाठी साधन नसल्याने शासनाने रेशनिंग दिले पाहिजे, अशी मागणी धरणग्रस्तांनी या वेळी केली आहे. अन्यथा जलसंपदा विभागाची गुंजवणी धरणाजवळ असलेली
३५ ते ४० एकर जमीन पूर्ण
पुनर्वसन होईपर्यंत धरणग्रस्तांना भाडेतत्त्वावर कसण्यास द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)