डोळे पाणावले, कंठ दाटला...

By Admin | Updated: September 4, 2014 00:58 IST2014-09-04T00:58:31+5:302014-09-04T00:58:31+5:30

चिमुकल्या ‘युग’वर बुधवारी दुपारी गंगाबाई घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आणि मोठ्या भावाने अग्नी दिला. अंत्ययात्रेत जनसागर उलटला होता. यावेळी महिला असो

Eyes, peeps ... | डोळे पाणावले, कंठ दाटला...

डोळे पाणावले, कंठ दाटला...

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : जनसागर उलटला
नागपूर : चिमुकल्या ‘युग’वर बुधवारी दुपारी गंगाबाई घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आणि मोठ्या भावाने अग्नी दिला. अंत्ययात्रेत जनसागर उलटला होता. यावेळी महिला असो की पुरुष सर्वांचेच डोळे पाणावले होेते. युगचे अपहरण झाले, तेव्हापासून शहरातील प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी काळजी करीत होता.
अपहृत ‘युग’चा निर्घृण खून करण्यात आल्याचे वृत्त समजताच सामान्यजनही हादरून गेले. प्रत्येकाची पावले युगच्या घराकडे वळली. बुधवारी सकाळपासूनच डॉ. मुकेश चांडक यांच्या छापरूनगर चौकातील गुरुवंदना अपार्टमेंटजवळ गर्दी व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकाला युगला एकदा तरी डोळे भरून पाहायचे होते. पाहता पाहता हजारोंनी गर्दी केली. त्यांना आवरता येणेही शक्य नव्हते. अपार्टमेंटच्या आत पार्किंगमध्ये चांडक कुटुंबीयांसह अपार्टमेंटमधील फ्लॅटधारक आणि परिसरातील नागरिक युगची प्रतीक्षा करीत होते. गर्दी इतकी झाली की लोकांना आवरणे कठीण होत होते. आप्तेष्टांकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले जात होते. रस्त्यावर तर लोक होतेच परंतु परिसरातील इमारतींवरही लोक युगची प्रतीक्षा करीत उभे होते. अपार्टमेंटमधील युगचे मित्र आणि शेजारीसुद्धा इमारतींवरील बालकनीत उभे राहून त्याची प्रतीक्षा करीत होते.
अंत्यसंस्कारातून
सामाजिक संदेश
‘युग’चे अपहरण करून निर्घृण खून केल्याच्या घटनेमुळे चांडक कुटुंबीय हादरून गेले आहे. त्यांना स्वत:चाच होश नव्हता, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या लाडक्या चिमुकल्या युगच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर न करता केवळ संपूर्ण गोवऱ्यांचाच वापर करून सामाजिकतेचा संदेश दिला.
‘युग’ला अखेरचा निरोप
अंत्यसंस्काराचे घरगुती सोपस्कार पार पडल्यावर ‘युग’ची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. छापरूनगर चौक, वर्धमाननगरमार्गे ही अंत्ययात्रा गंगाबाई घाट येथे पोहोचली. अंत्ययात्रा पाहण्यासाठी मार्गात प्रत्येक ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. गंगाबाई घाट येथे सुद्धा हजारो लोक अगोदरच उपस्थित होते. शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. वडील आणि भावाने अग्नी दिला. यानंतर सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंत्ययात्रेत राजकीय पुढाऱ्यांसह, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यापाऱ्यांसह, घरगुती नोकरदार इतकेच नव्हे तर तरुणांसह समाजातील सर्वच स्तरातील मंडळी सहभागी झाली होती.
आई-वडिलांसह कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
सकाळपासूनच सर्वच जण युगची प्रतीक्षा करीत होते. शवविच्छेदनानंतर दुपारी १.५५ वाजता ‘अ‍ॅम्बुलन्स’ आली. प्रत्येकाचे डोळे अ‍ॅम्बुलन्सकडे वळले. एका पांढऱ्या कापडात गुंडाळलेले ‘युग’चे पार्थिव अ‍ॅम्बुलन्समधून बाहेर काढताच एकच हंबरडा फुटला. आई, वडील व मोठा भाऊ धृव तसेच इतर कुटुंबीयांची अवस्था रात्रभरापासून रडून अगोदरच वाईट झाली होती. आई-वडिलांची अवस्था तर वेड्यागत झाली होती. यावेळी इमारतीतील युगचे मित्र, मैत्रिणी आणि शेजाऱ्यांच्या भावनांचाही बांध फुटला. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करून दिली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
शांतीचे आवाहन
युगच्या हत्येनंतर संपूर्ण शहरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात निर्माण झालेला तणावानंतर बुधवारी नागरिक आणखी तीव्र निदर्शने करतील अशी चिन्हे होती. युगच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला आणि नागरिकांनी शांत रहावे, कायदा हाती घेऊ नये असे आवाहन करण्यात आले.
‘आय लव्ह यू बेटा’...
आईची शेवटची आर्त हाक
युगच्या अपहरणापासून त्याची आई आपली शुद्ध हरपून बसली होती. दोन-तीनदा बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. परंतु बुधवारी जेव्हा तिने आपल्या चिमुकल्याला तीन दिवसांनी पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती वेडावून गेली होती. युगची अंत्ययात्रा निघाली तेव्हा ती आपल्या चिमुकल्याला सोडायलाच तयार नव्हती. ती सुद्धा युगसोबत जाण्याची चिद्द करू लागली. आप्तेष्टांनी तिची बरीच समजून काढली. तिच्या हातातून युगच्या पार्थिवाची सुटका केली आणि गेट बंद केले, तेव्हा युगच्या नावाचा हंबरडा फोडता ‘युग आय लव्ह यू बेटा’... अशी शेवटची आर्त हाक तिने दिली.
भावनांचा आवेग
युगच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी केवळ त्याचे नातेवाईक व परिसरातील नागरिकच नव्हे तर शहरातील सर्व स्तरांतील लोक उपस्थित होते. जवळच्या झोपडपट्टीमधील तरुणांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. काही नागरिकांनी यावेळी गंगाबाई घाट परिसरात पोस्टर्स व बॅनर्समधून आपल्या भावना व्यक्त केल्या. आरोपीला थेट फाशीच देण्यात यावी अशी मागणी यातून समोर येत होती. काही लोकांनी या घटनेचा अहिंसात्मक मार्गाने निषेध करण्यासाठी ‘कॅन्डल मार्च’ला नागरिकांनी जमावे असे आवाहन ‘बॅनर’ हाती घेतलेल्या काही मुलांकडून करण्यात आले.

Web Title: Eyes, peeps ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.