कोट्यातील घरांच्या कागदपत्रांसाठी मुदतवाढ
By Admin | Updated: March 10, 2015 04:23 IST2015-03-10T04:23:35+5:302015-03-10T04:23:35+5:30
मुख्यमंत्री कोट्यातून घरे वितरीत करताना गैर प्रकार झाल्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश जे़

कोट्यातील घरांच्या कागदपत्रांसाठी मुदतवाढ
मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातून घरे वितरीत करताना गैर प्रकार झाल्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश जे़ ए़ पाटील यांच्या आयोगाला याप्रकरणाच्या फाईल्स् देण्यासाठी गृहनिर्माण व नगर विकास खात्याला उच्च न्यायालयाने सोमवारी मुदत वाढ दिली़
न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गृहनिर्माण विभागाला आठ आठवड्यांची तर नगर विकास खात्याला पाच आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे़
हे दोन्ही विभाग याच्या फाईल्स देत नसल्याचा आरोप करणारा अर्ज या आयोगाच्या सचिवांनी न्यायालयात सादर केला़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने या दोन्ही विभागांना चांगलेच फटकारले होते़ त्यामुळे सोमवारी या विभागांनी न्यायालयाकडे यासाठी मुदत मागितली़ त्यानुसार न्यायालयाने ही मुदत वाढ दिली़
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका केली आहे़ या कोट्यातून एका व्यक्तिला एकच घर देण्याचा नियम आहे़ मात्र हा नियम धाब्यावर बसवून या कोट्यातून एका व्यक्तिला दोन घरे वितरीत झाली आहेत़ त्यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीसाठी वरील आयोगाची स्थापना केली़
या कोट्यांतून घराचे वाटप करताना गैरव्यवहार झाल्याचा
आरोप याचिकाकर्त्याने केला
आहे. (प्रतिनिधी)