"एप्रिलच्या कोट्यातील साखर विक्रीस मुदतवाढ द्या; मेसाठी मर्यादित कोटा जाहीर करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 05:14 AM2021-04-06T05:14:10+5:302021-04-06T07:21:31+5:30

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाची मागणी

Extend April quota sugar sales | "एप्रिलच्या कोट्यातील साखर विक्रीस मुदतवाढ द्या; मेसाठी मर्यादित कोटा जाहीर करा"

"एप्रिलच्या कोट्यातील साखर विक्रीस मुदतवाढ द्या; मेसाठी मर्यादित कोटा जाहीर करा"

Next

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांकडील खुल्या बाजारात विक्रीसाठी दिल्या गेलेल्या साखर कोट्यापैकी जवळपास ५० टक्के कोटा शिल्लक असतानाच केंद्र सरकारने एप्रिलसाठी २२ लाख टन इतका विक्रमी साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या कोट्यातील शिल्लक साखरेसाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच मे महिन्यासाठी मर्यादित कोटा जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केली आहे.

केंद्र शासनाकडून गेल्या सहा महिन्यांत दिला गेलेला सहकारी साखर कारखान्यांच्या कोट्यापैकी निम्म्याच साखरेची प्रत्यक्ष विक्री होऊ शकली नसल्याने हे कारखाने अडचणीत आले आहेत. या उलट उत्तर प्रदेशातील बहुतांशी खाजगी क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यापेक्षा अधिक साखरेची विक्री केली आहे.

पाच वर्षांतील एप्रिलमधील विक्रमी विक्री कोटा
केंद्र सरकारने एप्रिलसाठी जाहीर केलेला २२ लाख टनाचा साखर कोटा गेल्या पाच वर्षांतील विक्रमी आहे. गेल्या पाच वर्षांतील तो सरासरी १८ लाख टन होता. मार्च २०२० मध्ये उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व मिठाई, थंड पेये, चॉकलेट्स, बिस्किटे, सरबते यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने साखरेची विक्री जवळपास १० लाख टनांनी कमी झाली होती. आताही तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता दिसू लागली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्न समारंभे व सार्वजनिक कार्यक्रमावरील बंदी तसेच अंशतः लॉकडाऊन जाहीर झाल्याने याचा साखर विक्रीवर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे एप्रिलच्या कोट्याच्या साखर विक्रीसाठी मुदतवाढ मिळावी व पुढील महिन्याचा मर्यादित साखर कोटा जाहीर करावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.
-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Web Title: Extend April quota sugar sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.