‘एसएनडीएल’ला हद्दपार करा!
By Admin | Updated: January 26, 2015 00:55 IST2015-01-26T00:55:32+5:302015-01-26T00:55:32+5:30
नागपूर शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाल्याने या कंपनीकडून

‘एसएनडीएल’ला हद्दपार करा!
आमदार-नगरसेवकांची मागणी : पालकमंत्र्यांनी दिले आॅडिट करण्याचे आदेश
कोराडी : नागपूर शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाल्याने या कंपनीकडून वीजपुरवठ्याचे कंत्राट काढून घेण्यात यावे, अशी मागणी नागपूर शहरातील चार आमदार, महापौर व नगरसेवकांनी केली आहे. त्यातच या कंपनीचे तीन वर्षांचे प्रशासकीय आॅडिट करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोराडी वीज प्रकल्पाच्या विश्रामगृहात रविवारी पार पडलेल्या बैठकीत सदर मागणी करण्यात आली. या प्रसंगी पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, अर्चना डेहनकर यांच्यासह नगरसेवक, ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ तसेच महानिर्मिती व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदारांसह नगरसेवकांनी ‘स्पॅन्को-एसएनडीएल’च्या कार्यप्रणालीमुळे निर्माण झालेल्या तक्रारींचा पाढा वाचला. वीज कंपनीने ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ला देखभालीसाठी ३६ कोटी रुपये दिले. त्यात कोणती कामे करण्यात आली, ते तपासा, ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ने रात्रीच्यावेळी किंवा पूर्वसूचना न देता धाडी टाकू नये, यासाठी महावितरणची परवानगी घ्यावी, मागणीनुसार सबमीटर द्यावे यासह अन्य समस्या उपस्थित करण्यात आल्या.
ग्राहकांना अवाजवी बिल पाठविले जाते. त्यात वीज आकारणी रकमेपेक्षा अधिभाराची रक्कम अधिक असते. मीटर बदलविण्याच्या नावावर ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप. आ. देशमुख यांनी केला. गरज नसताना मीटर बदलविण्यात येत असून, त्यासाठी अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप महापौर दटके यांनी केला.
या सर्व समस्यांचे निराकरण १५ दिवसांत करावे, शहरातील सर्व कार्यालये पूर्ववत सुरू करावे, तीन वर्षांचे आॅडिट करण्याचे आदेश बावनकुळे यांनी ‘स्पॅन्को-एसएनडीएल’च्या अधिकाऱ्यांना दिले. यात सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मीटरची व्हीएनआयटीकडून तपासणी करावी, मीटर बदलविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, असे आदेश बावनकुळे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता मोहन झोड यांना दिले. (वार्ताहर)