निर्यातक्षम द्राक्षांचे दर उतरले

By Admin | Updated: April 17, 2017 02:53 IST2017-04-17T02:53:22+5:302017-04-17T02:53:22+5:30

निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र यंदा दुपटीने वाढल्यामुळे युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षांचे दर चार किलोच्या पेटीला ८० ते १०० रुपयांनी उतरले आहेत.

Exportable grape rates get off | निर्यातक्षम द्राक्षांचे दर उतरले

निर्यातक्षम द्राक्षांचे दर उतरले

अशोक डोंबाळे , सांगली
निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र यंदा दुपटीने वाढल्यामुळे युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षांचे दर चार किलोच्या पेटीला ८० ते १०० रुपयांनी उतरले आहेत. त्यातच तापमान वाढल्यामुळे द्राक्षमणी मऊ पडत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
समाधानकारक पाऊस आणि वातावरणही चांगले राहिल्यामुळे जिल्ह्यात १,५७५ शेतकऱ्यांनी ८७०.५६ हेक्टरवर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले. गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्षे निर्यातीत दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या तीनशे हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे शिल्लक आहेत.
यंदा द्राक्षाची निर्यात उशिराच सुरू झाली. चांगला पाऊस आणि वातावरणही पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात केली. जिल्ह्यात ३०० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर असणारे निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र २०१६-१७ मध्ये ८७०.६५ हेक्टरवर पोहोचले. आतापर्यंत ८४६ शेतकऱ्यांची ६५५.२९ हेक्टर क्षेत्रातील ८७३४.७५ टन द्राक्षे ६७० कंटेनरमधून १९ राष्ट्रांत निर्यात झाली आहेत. अजून २१४.६१ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे निर्यात करण्याची शिल्लक आहेत.
द्राक्षघडांची तोड केल्यानंतर निर्यातीपूर्वी ती शीतगृहामध्ये ठेवावी लागतात. सध्याच्या तापमानामध्ये तापलेली द्राक्षे शीतगृहात ठेवल्यानंतर काळी पडत आहेत. तसेच भारतातून युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षे पोहोचण्यास जास्त कालावधी लागत असल्यामुळे मऊ पडलेली द्राक्षे टिकत नाहीत. युरोपीयन राष्ट्रांमध्ये २५ मार्चपर्यंतच द्राक्षाला जास्त मागणी असते. त्यानंतर फारशी मागणी नसते. त्यामुळे दर उतरले असल्याचे निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Exportable grape rates get off