एक्स्प्रेसवरील दगडफेकीत प्रवाशाचा डोळा निकामी
By Admin | Updated: August 10, 2015 01:21 IST2015-08-10T01:21:07+5:302015-08-10T01:21:07+5:30
मुंबई-पुणे धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसवर पनवेल ते कर्जतच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीमुळे एका प्रवाशाच्या डोळ्याला दगड लागून या प्रवाशाचा डावा

एक्स्प्रेसवरील दगडफेकीत प्रवाशाचा डोळा निकामी
खोपोली : मुंबई-पुणे धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसवर पनवेल ते कर्जतच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीमुळे एका प्रवाशाच्या डोळ्याला दगड लागून या प्रवाशाचा डावा डोळाच निकामी झाल्याची घटना गुरुवारी (७ आॅगस्ट) रोजी घडली. गणेश वाणी (५२, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे या घटनेतील जखमी प्रवाशाचे नाव असून, त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
गणेश वाणी हे सहकार विभागात कार्यरत असून, मुंबईतील फोर्ट परिसरात त्यांचे कार्यालय आहे. वाणी हे दररोज प्रगती एक्स्प्रेसने मुंबई ते पुणे प्रवास करतात.
७ आॅगस्टला वाणी मुंबईतून प्रगती एक्स्प्रेसने पुण्याला जात होते. गाडीने पनवेल स्थानक सोडल्यानंतर काळुंद्रे गावाजवळ अचानक एक दगड वेगाने आला आणि खिडकीमध्ये बसलेल्या गणेश वाणी यांच्या डोळ्याला लागला. कर्जत स्थानकावर वाणी यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस वाणी अतिदक्षता विभागात होते. रविवारी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले. धावत्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड डोळ्याला लागल्याने वाणी यांचा डावा डोळा निकामी झाला आहे. (वार्ताहर)