खापरखेडा वीज केंद्रात स्फोट
By Admin | Updated: April 7, 2015 04:16 IST2015-04-07T04:16:17+5:302015-04-07T04:16:17+5:30
स्थानिक औष्णिक वीज केंद्राच्या युनिट क्रमांक - ४ मध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली

खापरखेडा वीज केंद्रात स्फोट
खापरखेडा : स्थानिक औष्णिक वीज केंद्राच्या युनिट क्रमांक - ४ मध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यात कुणीही मृत अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीमुळे सध्या हा संच बंद करण्यात आला असून येत्या दोन दिवसांत तो सुरू होणार आहे.
खापरखेडा येथील वीज केंद्रात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना त्यातील युनिट क्रमांक - ४ मध्ये काही कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले. क्षणार्धात स्फोट झाला आणि संपूर्ण वीज केंद्राच्या आवारात अंधार झाला. हा स्फोट टर्बाईन बेसमेंटमध्ये झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. या टर्बाईन बेसमेंटचे व्हायब्रेशन २ एप्रिलपासून सहापट वाढले होते. त्यामुळे सदर युनिट बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते युनिट ४ एप्रिलला पुन्हा सुरू करण्यात आले होते. संच क्र. ४ हा २१० मेगावॅट क्षमतेचा असून तेथून सध्या १८० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होती. दरम्यान, रविवारी नियंत्रण कक्षाच्या समोरील टर्बाईनच्या डाव्या बाजूला आग लागली. एचपीसीव्ही-१ ला तेल गळती झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागातील तीन आग बंब आणि फोमच्या साह्याने आग नियंत्रणात आणली. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात २१० मेगावॅटचे चार संच असून, ५०० मेगावॅट क्षमतेचा आणखी एक संच आहे.