पायामधील स्टील रॉडने झाला महिलेच्या हत्येचा उलगडा

By Admin | Updated: November 20, 2014 03:12 IST2014-11-20T03:12:18+5:302014-11-20T03:12:18+5:30

कुर्ल्यातील रेल्वे ट्रॅकलगत रविवारी चुनाभट्टी पोलिसांना एका ५० वर्षीय महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला होता.

Explain the murder of a woman with a steel rod in the base | पायामधील स्टील रॉडने झाला महिलेच्या हत्येचा उलगडा

पायामधील स्टील रॉडने झाला महिलेच्या हत्येचा उलगडा

मुंबई: कुर्ल्यातील रेल्वे ट्रॅकलगत रविवारी चुनाभट्टी पोलिसांना एका ५० वर्षीय महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या पायामध्ये असलेल्या स्टीलच्या रॉडमुळे या हत्येचा उलगडा झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
चुनाभट्टी आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या कुरेशी नगर परिसरातील काही लहान मुले नेहमीप्रमाणे रविवारी परिसरात क्रिकेट खेळत होती. याच दरम्यान त्यांचा चेंडू परिसरातील झाडांमध्ये गेला. यातील एक मुलगा चेंडू घेण्यासाठी गेला असता, त्याला या महिलेचा जळालेला मृतदेह दिसला. त्याने ही माहिती तत्काळ परिसतील रहिवाशांना सांगितली. रहिवाशांनी याबाबत चुनाभट्टी पोलिसांना फोन करताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेह जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविला. महिलेचे संपूर्ण शरीर जळालेले होते. त्यामुळे केवळ सांगाडाच शिल्लक होता. शवविच्छेदन करत असताना येथील डॉक्टरांना महिलेच्या उजव्या पायात एक स्टीलचा रॉड आढळून आला. त्यांनी हा रॉड पोलिसांच्या ताब्यात दिला.रॉडसंदर्भात काळबादेवी येथील सर्जिकल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानामध्ये चौकशी केली. मात्र हा रॉड गुजरातमधील एका कंपनीत तयार केल्याचे त्यावर असलेल्या नंबरवरुन समजले. पोलिसांचे एक पथक तत्काळ गुजरात येथे रवाना झाले. त्यानुसार २०१२ला पनवेलमधील एका डॉक्टराने त्याची आॅर्डर देऊन तो रॉड कुर्ल्यातील एका नर्सिंग होममध्ये पाठवल्याचे समजले. याठिकाणी आल्यानंतर कुर्ल्यातील विनोबा भावे नगरात राहणाऱ्या हापिजा खातून या महिलेच्या उजव्या पायात हा रॉड टाकल्याचे येथील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. याच नर्सिंग होममधून महिलेचा पत्ता मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचे घर शोधून काढले.
घरासाठी वाहीद शेखने या महिलेला कुरेशी नगर परिसरात नेऊन तिचा गळा आवळला. त्यानंतर रहिमउद्दीन अन्सारी (३२) आणि सैफुद्दीन शेख (४८) या दोघांच्या मदतीने त्याने रात्रीच्या वेळेस महिलेचा मृतदेह जाळून टाकला. (प्रतिनिधी)

Web Title: Explain the murder of a woman with a steel rod in the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.