हार्बरवर कालबाह्य गाड्या
By Admin | Updated: April 6, 2015 04:13 IST2015-04-06T04:13:34+5:302015-04-06T04:13:34+5:30
रेल्वेचे केवळ दोनच मार्ग, बारा डबा लोकलची प्रतीक्षा, एसी-डीसीला लागणारा विलंब पाहता हार्बरवासीय प्रवासी रेल्वेच्या महत्वाच्या सुविधांपासून अजूनही

हार्बरवर कालबाह्य गाड्या
मुंबई : रेल्वेचे केवळ दोनच मार्ग, बारा डबा लोकलची प्रतीक्षा, एसी-डीसीला लागणारा विलंब पाहता हार्बरवासीय प्रवासी रेल्वेच्या महत्वाच्या सुविधांपासून अजूनही वंचित राहिलेले आहेत. असे असतानाच हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर अजूनही २५ वर्षे जुन्याच लोकल धावत असल्याचे वास्तव
समोर आले आहे. अशा २७
लोकल हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावर मेन लाईन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर १२१ लोकल असून त्यांच्या १,६१८ फेऱ्या होतात. यातून दिवसाला ४0 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवाशांच्या दिमतीला बंबार्डियर कपंनीच्या लोकलही लवकरच आणल्या जाणार आहेत. सध्या दोन बंबार्डियर लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक सोयिसुविधांचा वर्षाव होत असताना हार्बरवरील प्रवासी मात्र उपेक्षितच आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एकूण १२१ लोकलपैकी ४६ लोकल या हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर धावतात. या ४६ लोकलमध्ये ३६ हार्बरवर तर १0 ट्रान्स हार्बरवर लोकल धावत आहेत. मात्र या ४६ लोकलधील २७ लोकल या जुन्या असून त्यांचे आयुर्मान संपल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यांना २५ वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २७ गाड्यांध्ये १५ गाड्या डीसी-एसी परावर्तनावर धावणाऱ्या, नऊ गाड्या भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (भेल) आणि तीन गाड्या रेट्रोफिटेड आहेत. २७ लोकल गाड्यांचे आयुर्मान २0११ मध्येच संपले आहे. परंतु त्या २0१६ पर्यंत सुरुच ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याचा फटका मात्र प्रवाशांना बसू शकतो. जुन्या लोकलमुळे अपघातांचा धोकाही संभवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी
सांगितले. (प्रतिनिधी)