महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:15 IST2017-03-02T02:15:56+5:302017-03-02T02:15:56+5:30

वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Expansion of MND scheme by July | महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला जुलैपर्यंत मुदतवाढ

महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला जुलैपर्यंत मुदतवाढ


मुंबई : थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत ३० एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकार रक्कम माफ होणार आहे. १ मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व विलंब आकार रक्कम माफ करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली. योजनेचा लाभ ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच अन्य वर्गवारीतील वीजग्राहकांना घेता येईल. याचबरोबर लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांनादेखील या योजनेत सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल, असे महावितरणने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
थकबाकी ‘आॅनलाइन’देखील
मूळ थकबाकीची रक्कम आॅनलाइनही स्वीकारण्यात येणार आहे. संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची किती रक्कम जमा करावी, याची तपशीलवार माहिती ‘आॅनलाइन’ उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत थकबाकीमुक्त ग्राहकांना त्वरित वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सेवा शुल्क, रिकनेक्शन शुल्क यातही सूट देण्यात येणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती उपलब्ध आहे.

Web Title: Expansion of MND scheme by July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.