महापौर, नगराध्यक्षांना मुदतवाढ
By Admin | Updated: June 13, 2014 03:08 IST2014-06-13T03:08:38+5:302014-06-13T03:08:38+5:30
जून ते आॅक्टोबर २०१४ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या महापौर, उपमहापौर व नगराध्यक्ष या पदांच्या निवडणुकी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत
महापौर, नगराध्यक्षांना मुदतवाढ
गजानन मोहोड, अमरावती
जून ते आॅक्टोबर २०१४ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या महापौर, उपमहापौर व नगराध्यक्ष या पदांच्या निवडणुकी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात यंत्रणा व्यस्त असल्याचे कारण दर्शविता शासनाने या पदाच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रस्थापित केलेले अध्यादेश व विनियमन हे शासनाच्या राजपत्रात १० जून रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत. या प्रक्रियेत यंत्रणेवर ताण येऊन कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये तसेच यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यात शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या पदांचा कालावधी वाढविण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. तसेच मंगळवारी राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ही मुदतवाढीची अधिसूचना शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नंतरच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी मात्र ६ महिन्यांनी कमी होणार आहे.