एक कप चहाच्या बदल्यात ७ जवान शहीद - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: January 5, 2016 09:34 IST2016-01-05T09:34:07+5:302016-01-05T09:34:36+5:30

पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड उत्तर केव्हा देणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला आहे.

In exchange for a cup of tea, seven jawans martyred - Uddhav Thackeray | एक कप चहाच्या बदल्यात ७ जवान शहीद - उद्धव ठाकरे

एक कप चहाच्या बदल्यात ७ जवान शहीद - उद्धव ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी व सरकारला जाब विचारत पठाणकोट हल्ल्याला तोडीस तोड उत्तर केव्हा देणार असा सवाल विचारला आहे. 'आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते' अशा शब्दांत उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
शरीफ यांच्यासोबत झालेल्या चहाच्या बदल्यात पठाणकोटला सात जवानांनी मरण पत्करले. त्या वीर जवानांची कुटुंबे आक्रोश करीत आहेत. पंतप्रधान त्या शहीदांच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार असा थेट सवाल उद्धव यांनी विचारला आहे. फक्त सहा माथेफिरू दहशतवाद्यांची किंमत चुकवून पाकिस्तानने हिंदुस्थानची अब्रू घालवली आहे. देशाचे संरक्षणमंत्री, पंतप्रधान यांनी या प्रकरणातून धडा घ्यावा व सुधारणा कराव्यात, असा सल्लाही लेखातून देण्यात आला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात : 
फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे. हवाई दलाच्या पंजाबमधील पठाणकोट येथील तळावर मूठभर दहशतवादी जोरदार हल्ला करतात व ७२ तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा आहे. हजारो सैनिक, रणगाडे, पंजाबचे पोलीस पठाणकोटला आहेत तरीही फक्त सहा-सात दहशतवाद्यांनी या लष्करी सामर्थ्यास जेरीस आणले. सात जवान या युद्धात शहीद झाले व पन्नासावर घायाळ झाले. हा हिशेब तपासला तर फक्त सहा माथेफिरू दहशतवाद्यांची किंमत चुकवून पाकिस्तानने हिंदुस्थानची अब्रू घालवली आहे. देशाचे संरक्षणमंत्री, पंतप्रधान वगैरे मंडळींनी धडा घ्यावा व सुधारणा कराव्यात असा हा प्रकार आहे.
- हवाई तळाच्या परिसरात वेगवेगळ्या भागांतून गोळीबार होत असल्याने नेमके किती दहशतवादी लपले आहेत ते सांगता येत नाही. हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती देणे शक्य आहे.’ हे केंद्रीय गृहसचिवांनी केलेले वक्तव्य म्हणजे सरकारच्या डोळ्यासमोर पसरलेला काळोख आहे.
- पंतप्रधान मोदी हे आठ दिवसांपूर्वीच स्वत:च लाहोरला जाऊन पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाहुणचार घेऊन आले. त्यावेळीच आम्ही इशारा दिला होता, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. धोका होईल. पहा, भयंकर धोका झाला! मोदी यांची पाठ वळताच जैश-ए-मोहंमदच्या म्होरक्यांनी हिंदुस्थानच्या हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांचा पाकिस्तानने म्हणे निषेध केला. आम्ही विचारतोय, निषेध करण्याचे ढोंग का करता? हिंदुस्थानशी संबंध खरोखरच सुधारायचे असतील तर पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अजहरला हिंदुस्थानच्या हवाली करा! मोदी स्वत:च लाहोरला आले व नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापला. मग शरीफ यांनी त्या मसूद अजहरला मोदी यांच्या हवाली करावेच! पंतप्रधान मोदी यांनी अचानक लाहोर यात्रा करताच, ‘काय हा मुत्सद्दीपणा! जग तर थक्क झाले!’ असे सांगितले गेले. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर त्या सगळ्यांची दातखिळी बसली आहे. काँग्रेस राजवटीत असा हल्ला आज झाला असता तर ‘पाकिस्तानवर हल्ला करून धडा शिकवा!’ अशी मागणी झाली असती; पण आज कोणीच बोलत नाही व बलिदान केलेल्या जवानांना फक्त ‘ट्विटर’वर श्रद्धांजली वाहण्याचे राष्ट्रकार्य चालले आहे. 
- पंतप्रधान मोदी यांनी जगाची बांधणी सुरू केली आहे. आता आपल्या देशाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानचे अतिरेकी आमच्या हवाई तळावर घुसले तेव्हा मदतीसाठी सर्व जग धावले नाही. त्यांनीही आपापल्या देशांतून फक्त निषेधच केला आहे. पण लढून वीरमरण पत्करावे लागते ते आमच्या जवानांना. हे आणखी किती सहन करायचे? कसाबसह फक्त सहा-सात दहशतवादी मुंबईत घुसतात व वीस पोलिसांचा बळी घेऊन तीनशेच्या वर निरपराधी नागरिकांची हत्या करतात. इतकी मनुष्यहानी तर प्रत्यक्ष युद्धात होत नाही. संसदेवरील हल्ल्याचेही तेच गणित. मग पाकिस्तानला धडा शिकवला म्हणजे नेमके काय केले? 
- नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान नव्हते तेव्हाचे त्यांचे एक वाक्य आम्हाला आज आवर्जून आठवते आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदी म्हणाले होते, ‘भाई, बंदुक की गोली की गुँज में वार्ता कैसे हो सकती है?’ मोदींनी तेव्हा केलेला हा सवाल रास्तच होता. आम्हाला तेच मोदी हवे आहेत! आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते. आपल्या बहाद्दर सैनिकांची आणखी किती कलेवरे आपल्याच देशात पडलेली पाहायची? जवानांच्या अलौकिक शौर्याचा पुरुषार्थ बाळगतानाच आता पाकिस्तानात फौजा घुसवून दुश्मनांचे काय नुकसान केले ते देशाला सांगा. 

Web Title: In exchange for a cup of tea, seven jawans martyred - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.