वसई पूर्वेतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: August 1, 2016 03:12 IST2016-08-01T03:12:39+5:302016-08-01T03:12:39+5:30
एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे.

वसई पूर्वेतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात
वसई : वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. एमएमआरडीने कोट्यावधी रुपये खर्च करुन या रस्त्याचे रुंदीकरण केले. परंतू सध्या रस्त्यावर खाजगी ट्रान्सपोर्ट, कार शो रुम मालकांकडून आपली वाहने उभी करण्यासाठी रस्त्याचा वापर केला जात असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
या मुख्य रस्त्यावर चोवीस तास वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व पुढे मुंबईकडे जाण्यासाठी वसईकरांना याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. यावेळी रस्तारुंदीकरणात ग्रामस्थांची जुनी घरे तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली दुकाने तोडण्यात आली. जनहिताचेकाम होत असल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध न करता सहकार्य केले. परंतु आता रस्तारुंदीकरणाचा फायदा वाहनचालकांना, स्थानिकांना कमी व व्यापाऱ्यांंनाच जास्त होत आहे.
या रस्त्याच्या बाजुला असलेले कार विक्रेते त्यांच्या नवीन व जुन्या गाड्या मुख्य रस्त्यावर पार्किंग करु लागले आहेत. अनेक गॅरेजनी रस्त्यावर धंदा थाटला आहे. तर काही ट्रान्सपोर्ट चालकांकडून या रस्त्याचा आपल्या बसेस उभ्या करण्यासाठी दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
परिणामी सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीचा चक्का जाम होत असून वाहन चालकांचा वेळ व इंधनाच वाया जात आहे. (प्रतिनिधी)
>स्थानिक संतप्त अवैध पार्र्किं ग न रोखल्यास होऊ शकते दुर्घटना
वसई पूर्वेतील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची घरे, जमिनी व दुकान ेगेली आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेचे दुर्लक्ष व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे. मुख्य रस्त्यावर केल्या जात असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.
महापालिकेने या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध न घातल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे शिवसेना उपविभागप्रमुख नरेंद्र भोईर यांनी सांगितले.
त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. पालिकेने कारवाई न केल्यास मात्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.