दहावी, बारावीची आजपासून परीक्षा
By Admin | Updated: September 26, 2014 02:56 IST2014-09-26T02:56:31+5:302014-09-26T02:56:31+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणारी इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे

दहावी, बारावीची आजपासून परीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणारी इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. राज्यातील १ लाख ३७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी दहावी तर ९५ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. दहावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर आणि बारावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते २० आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. भाषा विषयांसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा व ८० गुणाची लेखी परीक्षा असेल. पर्यावरण हा विषय अनिवार्य असून, त्याची परीक्षा शाळा व महाविद्यालय स्तरावर घेतली जाणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी (प्रथम भाषा) आणि इंग्रजी (द्वितीय व तृतीय भाषा) या विषयांची परीक्षा एकाच दिवशी एकाच सत्रामध्ये ठेवण्यात आली आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत (क्लास इम्प्रुमेंट स्कीम) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रविष्ट झालेल्या सर्व विषयांची लेखी परीक्षा द्यावयाची असून, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा नव्याने देणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)