वेळेवर आलेल्यांचीच नीट परीक्षा

By Admin | Updated: May 7, 2017 20:23 IST2017-05-07T20:23:19+5:302017-05-07T20:23:19+5:30

अखिल भारतीय स्तरावर वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅन्ड एन्ट्रन्स टेस्ट) रविवारी पार पडली.

The exact time of the examinations is very good | वेळेवर आलेल्यांचीच नीट परीक्षा

वेळेवर आलेल्यांचीच नीट परीक्षा

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 7 - अखिल भारतीय स्तरावर वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅन्ड एन्ट्रन्स टेस्ट) रविवारी पार पडली. परीक्षा केंद्रांवर वेळेत न पोहोचता आल्यामुळे अ़नेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले तर आधार कार्ड न आणल्यामुळे अनेकांना परीक्षा केंद्रांतून निराश होऊन पेपर न देताच परत जावे लागले. त्यामुळे काही परीक्षा केंद्रांवर पालक व विद्यार्थी संतप्त झाले होते. मात्र एकंदर शहरात परीक्षा ही शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

सीबीएसईकडून रविवारी नीट परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते १ ही परीक्षेची वेळ होती व त्यासाठी सकाळी ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आत यावे, अशी प्रवेशपत्रावरच अट होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आधार कार्डदेखील आणणे सक्तीचे करण्यात आले होते. परंतु विविध कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला. काही विद्यार्थी बाहेरगावाहून आले होते, तर अनेकांना परीक्षा केंद्रच दूर मिळाल्यामुळे ते शोधताना त्यांना उशीर झाला. परंतु नियमांनुसार विद्यार्थी वेळेत आले नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी गमवावी लागल्याने काही परीक्षा केंद्रावर पालकांनी आरडाओरड केली. विद्यार्थी आणि पालकांनी शाळा प्रशासनाकडे विनंती करूनही त्याचा उपयोग झाला नाही. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय, प्रियदर्शिनी महाविद्यालय इत्यादी ठिकाणी विद्यार्थी उशिरा आल्यामुळे बाहेरच उभे होते.

बाहेर काढावी लागली पादत्राणे
नीटसाठी नागपूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर २० हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. मागील वर्षीपासूनच सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड लागू केला होता. सीबीएसईच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांनी असेच कपडे घालून जाणे अपेक्षित होते, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे यंत्र लपविणे शक्य होणार नाही. ड्रेस हा पूर्ण बाह्यांचा असू नये, त्यात मोठी बटन नसावी, कुठल्याही प्रकारचे दागिने घालू नयेत, जोड्याऐवजी चप्पल किंवा स्लीपर घालावी, अशा सूचना सीबीएसईकडून देण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थी सॅन्डल किंवा जोडे घालून आले होते. त्यांना ते परीक्षा केंद्राच्या बाहेरच काढून पेपर देण्यासाठी आत जावे लागले.

Web Title: The exact time of the examinations is very good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.