ex mla Vani Will speak Vijapur Candidate | वैजापूरच्या उमेदवारीसाठी वाणींच्या 'शब्दाला' महत्व असेल: चंद्रकात खैरे
वैजापूरच्या उमेदवारीसाठी वाणींच्या 'शब्दाला' महत्व असेल: चंद्रकात खैरे

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे वैजापूरमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेनंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकात खैरे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. मात्र वैजापूर बाबत माजी आमदार आर.एम.वाणींच्या 'शब्दाला' महत्व असेल असा खुलासा खैरे यांनी केला आहे. तसेच मी निवडणूक लढवणार हे जर तरच्या गोष्टी असल्याचे सुद्धा खैरे म्हणाले.

वैजापूरमधून सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेचे आर.एम वाणी यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पराभव केला होता. तर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने खुलासा करताना, प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून खैरे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत खुलासा करताना खैरे म्हणाले की, वैजापूर मतदारसंघाबाबत शिवसेनेचे माजी आमदार वाणी ज्या नावाची शिफारस करतील त्याबाबत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू. त्यानंतर उद्धव ठाकरे हे सांगतील तो निर्णय अंतिम राहील.

विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या सेनेच्या बैठकीत वाणी यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली होती. वाणी यांनी नाव सुचवलेले बोरनारे यांचे पक्षातील काम चांगले आहे. असे सुद्धा खैरे म्हणाले. तसेच पक्षाचे आदेश असल्यास आपण निवडणूक लढवणार का ? यावर बोलताना खैरे म्हणाले की, ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता सांगता येणार नाहीत. परंतु वैजापूर बाबत वाणी यांचा शब्द महत्वाचे असेल असा दावा खैरे यांनी केला आहे.

 

Web Title: ex mla Vani Will speak Vijapur Candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.