पुनर्मूल्यांकनाची संधी प्रत्येकाला
By Admin | Updated: March 14, 2015 05:46 IST2015-03-14T05:46:54+5:302015-03-14T05:46:54+5:30
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक

पुनर्मूल्यांकनाची संधी प्रत्येकाला
तेजस वाघमारे, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकन अर्ज करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव परीक्षा विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची मान्यता मिळाल्यास या निर्णयाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरण्याची संधी देण्यात येते. परंतु अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला संबंधित विषयात १६ पेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. यामुळे सर्व विषयांत चांगले गुण असताना केवळ एका विषयात १६ पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरता येत नव्हता. याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी बसत
आहे. पुनर्मूल्यांकनाची ही अट
शिथिल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात
येत होती.
विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी अनुत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यालाही पुनर्मूल्यांकन अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची फोटो कॉपीही मिळवता येणार आहे.
सध्या पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अर्जासोबत मार्कशीटची झेरॉक्स प्रत जोडावी लागते. त्यामुळे विद्यापीठाकडे प्रत्येक परीक्षेनंतर सुमारे ७0 हजार मार्कशीट्सचे पेपर येतात. विद्यार्थ्याचे परीक्षेचे गुण विद्यापीठाकडे असल्याने पुनर्मूल्यांकनाच्या अर्जासोबत झेरॉक्स प्रतीची आवश्यकता नसल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.