सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: February 13, 2015 09:42 IST2015-02-13T09:23:05+5:302015-02-13T09:42:07+5:30
नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात. सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे.

सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राजकारणात प्रवेश करताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण जनतेचा सेवक असतो. पण सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने शिवसेनेच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण असून राज्यातील मंत्रिमंडळात शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखात भाजपावर टीका केली. नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात, आता केजरीवाल स्वतःचे काय बारसे करुन घेतात हे बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणात येताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण 'सेवक' असतो पण त्यानंतर तो सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे. त्यामुळे केजरीवाल दिल्लीत काय काम करतात याकडे लक्ष लागले आहे असा चिमटाही त्यांनी काढला.
ओबामा दिल्लीत आले तेव्हा नरेंद्र मोदींनी ३० - ३५ लाख रुपयांचा कोट घातल्याची चर्चा होती. आता अरविंद केजरीवाल यांचा मफलरही ब्रँडेड होऊ नये असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे साध्या राहणीमानासाठी कौतुक केले आहे. समाज अनुकरणवादी असून प्रत्येक 'हिरो'ने जपून पाऊल टाकावे, सेवक तर सर्वच जण असून सेवकपणाचा अतिरेक करु नका. जनता हीच जनार्दन असून जनता पाठिशी आहे या अहंकारातून सर्वांनीच बाहेर पडावे असा उपदेशाचा डोसही उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्वाला पाजला आहे.