त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
By Admin | Updated: August 1, 2016 02:15 IST2016-08-01T02:15:31+5:302016-08-01T02:15:55+5:30
पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो.

त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
मुंबई : पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. पावसाळ्यात दूषित पदार्थ, पाणी प्यायल्यामुळे विषाणूंमुळे ताप, डोकेदुखी, गॅस्ट्रो, हॅपिटायटिस यांसारख्या आजारांची लागण होते. याविषयी महापालिका विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. तरीही पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी लोकांनी महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होणारी स्थाने ही ६० टक्क्यांहून अधिकवेळा घरातील असतात. घरातील एसी, फ्रीज, मनी प्लॉण्ट, झाडांखाली ठेवलेल्या ताटल्या, भंगाराचे सामान, करवंट्या यात पाणी साचते. अन्यथा गच्चीवर पाणी साचते. या ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास डासांची पैदास होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पण, या ठिकाणी साचलेले पाणी नागरिक साफ करीत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढतात. त्याचबरोबर रस्त्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, दूषित पाणी पिऊ नये असे आवाहन करण्यात येते.
तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अजूनही उच्चभ्रू सोसायटीमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना यायला मज्जाव केला जातो. महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)