‘पी अॅण्ड टी’तील सोसायट्यांत दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 03:45 IST2017-03-04T03:44:30+5:302017-03-04T03:45:01+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा पुन्हा समावेश झाल्यानंतर त्या गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

‘पी अॅण्ड टी’तील सोसायट्यांत दिवसाआड पाणी
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा पुन्हा समावेश झाल्यानंतर त्या गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. येथील आधीच्या नांदिवली ग्रामपंचायतीमधील पी अॅण्ड टी कॉलनीत राहणाऱ्या २२ सोसायट्यांतील रहिवाशांना दीड-दोन वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. स्थानिक नगरसेवकासह महापालिका प्रशासनाने पाठ फिरवल्याने रहिवाशांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले आहे.
तरीही, येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. उलट, तो दिवसेंदिवस भीषण होत आहे. गंगा, सर्वोदय पार्क, साई समर्थ, बालाजी दर्शन, श्रेया, गणराज, यमुना, सरस्वती आदी सोसायट्यांतील त्रस्त रहिवाशांनी यासंदर्भात एकत्र येत आवाज उठवला आहे. या ठिकाणी आता खाजगी तत्त्वावर दिवसाआड ११०० रुपये मोजून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. २२ ते २५ सोसायट्यांना हा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
राजेश खोत आणि ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, आधी ग्रामपंचायत होती, तेव्हाही पाण्याचा प्रश्न होताच. आता तो तीव्र झाला आहे. नगरसेविका रूपाली रवी म्हात्रेंसह पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पण, पालिका प्रशासनाने बघतो-करतो, अशी उत्तरे देत वेळ मारून नेली. नगरसेविका म्हात्रे यांनी वर्षभरापासून स्वखर्चाने आठवड्याला एक टँकर देण्यासाठी पुढाकार घेतला. पण, पाणीटंचाईसमोर त्यांचे साहाय्य तोकडे पडत आहे.
पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवल्यावर तातडीने संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. सूत्रे हलली. पण, ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ची स्थिती झाल्याचे ज्ञानेश्वर म्हणाले. ही समस्या असूनही गंगा सोसायटीने पाण्यासह अन्य करांबाबतचे ८६ हजारांचे बिल भरले. पाणीपट्टी भरूनही ही अवस्था असेल, तर बिल न भरणे योग्य आहे का? जे नियमाने वागतात, त्यांच्या वाट्याला हा अन्याय का, असा सवाल त्यांनी केला.
येथील पाणीसमस्या लवकरच निकाली निघेल. पुढील शुक्रवारपर्यंत मीटर टाकण्याची कामे होतील. त्यानंतर, चांगल्या पद्धतीने पाणी मिळेल. त्या कामासाठीच मी ई-प्रभागात ठाण मांडले आहे.
- रवी म्हात्रे, नगरसेविका,
रूपाली म्हात्रेंचे पती
सोसायट्यांनी माझ्याशीही संपर्क साधला आहे. त्यांची अडचण रास्त आहे. मी देखील तेथे टँकरने पाणी दिले होते. आठवडाभरात त्यांना न्याय न मिळाल्यास महापालिकेवर रहिवाशांचा मोर्चा काढण्यात येईल. - भाऊसाहेब चौधरी,
शिवसेना शहरप्रमुख-डोंबिवली