दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्तीचा संकल्प
By Admin | Updated: December 29, 2014 05:00 IST2014-12-29T05:00:40+5:302014-12-29T05:00:40+5:30
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे,

दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्तीचा संकल्प
पुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे ग्रामविकास, जलसंधारण आणि रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे सांगितले.
त्यासाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ मोहिमेतील जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहन त्यांनी पुणे विभागातील अधिकाऱ्यांच्या यशदा येथील कार्यशाळेत केले.
मुंडे म्हणाल्या की, वारंवार उद्भवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने प्रभावीपणे काम करायला हवे. त्याचबरोबर लोकसहभागाशिवाय ही योजना यशस्वी होऊ शकणार नाही. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याचा या योजनेत प्रयत्न असेल. योजनेच्या यशस्वीतेची त्रयस्थ घटकाकडून तपासणी केली जाईल.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे जिल्ह्यात योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व जबाबदारी उचलू, अशी ग्वाही दिली. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या योजनेमुळे गावे टंचाईमुक्त होतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)