एव्हरार्ड नगरात खड्ड्यांचे साम्राज्य
By Admin | Updated: August 1, 2016 02:22 IST2016-08-01T02:22:20+5:302016-08-01T02:22:20+5:30
एकीकडे मुंबई महानगर पालिका शहरात काही प्रमाणातच खड्डे असल्याचा दावा करत आहे.

एव्हरार्ड नगरात खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबई : एकीकडे मुंबई महानगर पालिका शहरात काही प्रमाणातच खड्डे असल्याचा दावा करत आहे. मात्र शहरातील प्रत्येक रस्त्यांवर सध्या खड्डेच पाहायला मिळत असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चुनाभट्टीच्या एव्हरार्ड नगर परिसरात तर सात ते आठ फूट लांबीचे खड्डे असल्याने त्याचा त्रास या परिसरात येणाऱ्या रुग्णांना तसेच रहिवाशांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.
सायन अथवा चेंबूरवरुन सोमय्या रुग्णालयात व प्रमुख स्वामी आय हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहन चालकांना सायनच्या पुलाखालून विळखा घालत एव्हरार्ड नगर मधून जावे लागते. त्यामुळे या सर्व्हिस रोडवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वर्षभरापूर्वीच महापालिकेने या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यावर्षी पाऊस सुरु होताच या रस्त्यांची अगदीच चाळण झाली आहे. या रस्त्यावर सात ते आठ फूट लांब आणि दीड ते दोन फूट खोल खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यातच या खड्ड्यांमुळे वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे.
पालिका कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याने या रस्त्याची अवस्था वर्षभरातच दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेचा सर्वाधिक त्रास सोमय्या रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना होत आहे. गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे तब्बल दीड ते दोन फूट खोल असल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांचेही या खड्ड्यांमुळे हाल होतात. त्यामुळे हा रस्ता पालिकेने तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)