अखेर मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण, २ जखमी
By Admin | Updated: January 13, 2017 07:57 IST2017-01-13T05:05:54+5:302017-01-13T07:57:53+5:30
तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनतर मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील शेकडो झोपड्यांना लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, मात्र या घटनेत २ जण जखमी झाले आहेत.

अखेर मानखुर्दमधील आगीवर नियंत्रण, २ जखमी
मुंबई, दि. १३ - तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनतर मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील शेकडो झोपड्यांना लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, मात्र या घटनेत २ जण जखमी झाले आहेत.
गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मंडाळा परिसरातील शेकडो झोपड्यांना गुरुवारी सायंकाळी आग लागली. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला सोळा फायर इंजीन आणि पाच वॉटर टँकर घटनास्थळी पाठवावे लागले. रात्रभर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. वाहतूककोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी दाखल होण्यास अग्निशमन दलाला विलंब झाला.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून घटनास्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या झोपड्यांतील रहिवाशांची महापालिकेतर्फे मानखुर्द महापालिका शाळा, मानखुर्द देवनार कॉलनी इंग्रजी शाळा, मानखुर्द मराठी शाळा क्रमांक एक येथे व्यवस्था करण्यात आली. या आगीत राजू यादव (३०) व अजू पाल (४०) हे दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेल व रद्दीची गोदामे असल्याने आग लवकर आटोक्यात आली नसल्याचे समजते.