मुंबई : बँक खाते नसले तरीही वंचित शेतक-यांना दुष्काळी मदत द्या, असे आदेश महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी जिल्हाधिका-यांना दिले़ लोकमतने सोमवारी या विषयावर प्रकाशझोत टाकला होता़ राज्यात विशेषत: मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या दुरावस्थेवर विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची गंभीर दखल घेतली. खडसे म्हणाले की, खरीप हंगामासाठी सरकारने ४ हजार ८०३ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. यातून तब्बल ६४ लाख १८ हजार ९८० शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ३४५ कोटींचा मदत देण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांपैकी अनेकांकडे बँक खाती नसणे, वारसा नोंद नसणे, एकाच सातबारावर अनेकांची नावे आदी तांत्रिक अडचणींमुळे मदत पोहचविता आली नसल्याचे खडसे म्हणाले़ यासंदर्भात जिल्हाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांना जातीने लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगून यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिल्याचे खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)
खाते नसले तरीही दुष्काळी मदत द्या!
By admin | Updated: April 1, 2015 02:11 IST