शहाणे झाले तरीही ते वेडेच!
By Admin | Updated: May 22, 2014 02:16 IST2014-05-22T02:16:13+5:302014-05-22T02:16:13+5:30
त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले.

शहाणे झाले तरीही ते वेडेच!
नागपूर : त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. अनेक वर्षांच्या उपचारानंतर आता ते बरे झाले. आता आपले कुटुंबीय येतील. आपला हात धरून घरी नेतील आणि उर्वरित जीवन कुटुंबीयांसह सुखासमाधानात आनंदाने जगायला मिळेल, अशी स्वप्नेही त्यांनी रंगविली. मात्र, समजदारांच्या मतलबी दुनियेचे वास्तव दुसर्याच क्षणाला त्यांच्या लक्षात आले. बरे झाल्यावर कुणीही त्यांना घरी नेण्यास तयार नाहीत. यासाठी समोर केल्या जाणार्या कारणांनी बसणारे झटके त्यांना शॉकपेक्षाही वेदना देणारे आहेत. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात बरे झालेले असे तब्बल २0५ जण आजही नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेच्यावतीने मागील वर्षी या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘सुदामा मित्र’ योजनेला मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीने पुनर्वसन केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३0 लाख ५८ हजार ३९४ रुपयांच्या कामासासाठी निविदा मागविल्या, परंतु आजही याचे काम थंडबस्त्यात आहे. राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी या चारही ठिकाणच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची स्थिती थोड्याबहुत अंतराने सारखीच आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच त्यांच्या भविष्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. नागपूर मनोरुग्णालयात बरे झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. ११६ महिला तर ८९ पुरुष आहेत. एकेकाळी हे कुणी पोलिसांकडून तर कोणी स्वकियांकडून मनोरुग्णालयात दाखल झाले. त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात गेले. अनेक वर्षांंच्या उपचारानंतर आता ते बरे झाले. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या पत्त्यांवर ते बरे झाल्याची बातमी दिली. परंतु तो पत्ताच अस्तित्वात नसल्याने पत्र परत आले. मनोरुग्णाचे जीवन मागे टाकलेल्या या रुग्णांना सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची इच्छा आहे. भविष्याची स्वप्ने रंगवत आहेत. कुणीतरी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल या ‘वेड्या’ आशेवर ही शहाणी झालेली माणसे आपल्या नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत! नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करीत आहे. सरकारच्या अपुर्या निधीतूनही ते बरे झालेल्यांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहेत; परंतु ते अपुरे पडत आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने उपचारानंतर बरे झालेल्या अशा रुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. सुदाम मित्र योजनेतून आशेचा किरण दाखविला. धंतोली झोन कार्यालय परिसरातील महापालिका शाळेची इमारतीची नेमणूक केली. त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी हलक्या कामांचे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांनीच विकाव्या, यासाठी तेथेच स्टॉलही लावून देणार होते. त्यांना बाहेरच्या जगाशी हळूहळू एकरूप करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु वर्षे होऊनही महापालिकेची सुदाम मित्र योजना सुरूच झाली नाही. त्यांनी जीवनाशी संघर्ष करून मनोरुग्णत्वावर मात केली. मात्र, त्यांच्या दुर्दैवाचे फेरे दूर करण्यास शासन आणि समाज कमी पडत असल्याचे यावरून दिसून येते. (प्रतिनिधी)