कर्ज फेडूनही सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले
By Admin | Updated: January 21, 2016 03:59 IST2016-01-21T03:59:06+5:302016-01-21T03:59:06+5:30
मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षांपूर्वी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याचा छळ सुरू ठेवत आणखी पैशांची मागणी केली तसेच त्यास बळजबरीने विष पाजल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

कर्ज फेडूनही सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले
बीड : मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षांपूर्वी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याचा छळ सुरू ठेवत आणखी पैशांची मागणी केली तसेच त्यास बळजबरीने विष पाजल्याचे प्रकरण उघड झाले आहे. शेतकऱ्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
बीड तालुक्यातील मानेवाडी येथील भरत उत्तरेश्वर माने (पोलीस पाटील) यांना १५ एकर कोरडवाहू शेती आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अप्पासाहेब मुंडे व सूर्यभान मुंडे यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. माने यांनी हळुहळू कर्ज फेडले होते. पाच वर्षांच्या काळात त्यांनी शेती विकून मुद्दल व्याजासह १० ते १५ लाख रुपये दिले. मात्र अप्पासाहेब व सूर्यभान मुंडे यांचे समाधान झाले नाही. ते त्यांच्याकडे वारंवार पैसे मागत होते. त्यातून १३ जानेवारीला अप्पासाहेब व सूर्यभान मुंडे यांनी माने यांना विषारी औषध पाजले व ते निघून गेले. जवळच्या शेतातील लोकांना हे समजताच त्यांना तात्काळ बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भरत माने यांची पत्नी इंदूमती माने यांच्या फिर्यादीवरुन अप्पासाहेब व सूर्यभान मुंडे यांच्यासह चौघांविरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)