एसटीला ‘टेन्शन’ तोट्यातील आगारांचे
By Admin | Updated: May 9, 2015 01:19 IST2015-05-09T01:19:31+5:302015-05-09T01:19:31+5:30
एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून, यात आगारांचा (डेपो) तोटा कमी करताना मात्र महामंडळाच्या चांगलेच

एसटीला ‘टेन्शन’ तोट्यातील आगारांचे
मुंबई : एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून, यात आगारांचा (डेपो) तोटा कमी करताना मात्र महामंडळाच्या चांगलेच नाकीनऊ येत आहेत. एसटीचे २५0पैकी तब्बल २११ आगार तोट्यात असून, गेल्या वर्षभरात फक्त नऊ आगारांचा नफा वाढविण्यात महामंडळाला यश आले आहे. त्यामुळे तोट्यातील आगारांचे एसटीला टेन्शन असून, हा तोटा कमी करायचा तरी कसा, असा प्रश्न पडला आहे.
एसटी महामंडळाचे राज्यात २५0 आगार असून, यामधून जवळपास १७ हजार गाड्यांची वाहतूक होते. मोठ्या प्रमाणात एसटीच्या सर्व आगारातून बसेस चालविल्या जातानाच कर्मचारी संख्या, बसेससाठी लागणारी साहित्य-सामग्री, वीज, डिझेल एसटीच्या आगारांमध्ये लागत आहे. यासाठी खर्च करताना एसटीच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे होणारा खर्च महामंडळाला परवडत नसून तो कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे २0१२मध्ये कामगार करारानुसार पगाराची पुनर्रचना झाल्यानंतर एसटी महामंडळावर आर्थिक ओझे अजूनच वाढत गेल्याचे सांगण्यात येते. सध्या प्रत्येक आगारात वाढलेले मनुष्यबळ, पगाराची झालेली पुनर्रचना, डिझेलचा वाढलेला खर्च ही प्रमुख कारणे आगार तोट्यात जाण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे २0१४-१५मध्ये २५0पैकी तब्बल २११ आगार तोट्यात गेलेत; तर ३९ आगार नफ्यात आहेत. २0१३-१४मध्ये २५0पैकी ३0 आगार नफ्यात होते. हे पाहता यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ आगारच नफ्यात आले. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना विचारले असता ते म्हणाले, यंदा ३९ आगार फायद्यात आहेत. २0१२पासून तोट्यातील आगारांची संख्या वाढत गेली आहे. पगाराची झालेली पुनर्रचना आणि वाढलेले मनुष्यबळ त्यास कारणीभूत ठरत आहे. तोटा होत असला तरी यातील कोणतेही आगार बंद करण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.