ऊसदर नियामक मंडळाची स्थापना
By Admin | Updated: November 7, 2014 23:33 IST2014-11-07T23:16:59+5:302014-11-07T23:33:20+5:30
आज अधिकृत घोषणा : विक्रमसिंह घाटगे, राजू शेट्टींसह १२ जणांचा समावेश

ऊसदर नियामक मंडळाची स्थापना
कोल्हापूर : ऊसदर ठरविण्यासाठी सहकार खात्याने आज, शुक्रवारी ऊसदर नियामक मंडळाची स्थापना केली. अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असून उद्या, शनिवारी याची अधिकृत घोेषणा होण्याची शक्यता आहे. नियामक मंडळात विक्रमसिंह घाटगे, खासदार राजू शेट्टी यांच्यासह बाराजणांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
दरवर्षी उसाच्या दरासाठी होणाऱ्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने गेल्यावर्षी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ऊसदर नियामक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. या मंडळात कोणाची वर्णी लावायची हेही ठरले होते; पण त्याला मूर्त स्वरूप आले नाही. त्यामुळे यावर्षीही ऊसदराची कोंडी होणार असे वाटत होते; पण भाजप सरकारने सत्तेवर येताच तातडीने नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागाने आज बाराजणांचे नियामक मंडळ तयार केले. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, तीन सहकारी साखर कारखान्यांचे, दोन खासगी साखर कारखान्यांचे व दोन इतर असे बारा जणांचे मंडळ तयार केले असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यावर स्वाक्षरी होणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
ऊसदराची कोंडी फुटणार!
ऊस दर नियामक मंडळाची स्थापना झाल्यानंतर येत्या आठ दिवसांत सदस्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे ऊसदराची कोंडी लवकर फुटण्यास मदत होणार आहे.
रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. बारा जणांच्या या मंडळात सर्वच घटकांना संधी दिली आहे. या मंडळाची पहिली बैठक आठवड्यात होऊन ऊस दराची कोंडी फोडली जाईल. - चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री
नियामक मंडळाची स्थापना स्वागतार्ह आहे. नुसती स्थापना करून चालणार नसून, कारखानदारीवर मंडळाचा अंकुश हवा. मंडळाने सुचविलेला दर न देणाऱ्या कारखानदारांना दोन वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीचा समावेश यामध्ये हवा. यासाठी प्रयत्नशील राहू.
- राजू शेट्टी, खासदार
संजय पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले
विक्रमसिंह घाटगे (संस्थापक, ‘शाहू’ कागल) खासदार विजयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष, राज्य साखर संघ)
जयप्रकाश दांडेगावकर (माजी सहकार राज्यमंत्री) बी. बी. ठोंबरे
श्री. दिवेकर (पूर्ती शुगर्स) खासदार राजू शेट्टी
रघुनाथदादा पाटील --पृथ्वीराज जाचक
राज्याचे मुख्य सचिव या नियामक मंडळाचे अध्यक्ष असतील.